आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे नंतर आता बीड: चोर असल्याचा संशयावरून जमावाकडून दोघांना मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- सध्या मुले पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा दिवसेंदिवस पसरत आहेत. यामुळे अनेक निष्पाप लोकांना मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच चोर असल्याच्या संशयावरूनही मारहाणीच्या अनेक घटना घडत आहेत. बीड तालुक्यातील पेंडगावजवळ रविवारी रात्री एक वेडसर व्यक्ती व एका दारुड्याला चोर असल्याच्या संशयावरून मारहाण झाली. परंतु, पोलिस वेळीच पोहोचल्याने त्यांचे प्राण वाचले.


पेंडगाव लगतच उभा असलेल्या ट्रकचा आडोसा घेऊन दोघे जण रविवारी रात्री बसले होते. त्यांचा उद्देश काही वेगळाच असल्याच्या संशयावरून जमावाने त्यांची सुरुवातीला विचारपूस केली. दोघांनाही स्वत:विषयी सविस्तर माहिती देता आली नाही. त्यावरून हे चोर असून ते चोरीच्या उद्देशानेच दडून बसल्याचा संशय नागरिकांना आला. त्यांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.


दरम्यान, काही सुजाण नागरिकांनी याबाबत बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. बल्लाळ यांनी रात्री गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पाठवले पाठवले. पोलिसांनी चौकशी केली असता दोघेही वेगळ्या ठिकाणचे असल्याचे समोर आले.  यापैकी मुकुंद मुरलीधर दुषी (४५ रा. करीमपुरा) हा बीड  तर अशोक मोहन माथाडे हा मुळचा मध्य प्रदेश येथील आहे. अशोक माथाडेला दारूचे व्यसन आहे. तो ट्रकवर क्लिनर असून त्याचे चालकाशी भांडण झाले होते. म्हणून त्यास चालकाने पेंडगाव येथेच सोडले होते. तो योगायोगाने दारुड्याजवळच बसला. त्यामुळे हे दोघे सोबतच असून चोरी किंवा इतर काही करण्याचा त्यांचा इरादा असल्याचा नागरिकांचा समज झाला होता.

 

राईनपाड्याच्या घटनेची पुनरावृत्ती टळली
मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून रविवारी साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावानजीक राईनपाडा येथे जमावाने पाच भिक्षुकांना ठेचून मारले. यातील चौघे सोलापूर जिल्ह्यातील होते. ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन त्यांना काहींनी लाथा-बुक्क्यांसह चपला, दगडविटांनी ठेचले. यातच पाचही जणांनी प्राण सोडले. या घटनेतही जमाव आक्रमक झाला होता. मात्र, पोलिस घटनास्थळी तत्काळ पोहोचल्याने आणि त्या दोघांची जमावाला ओळख पटवून दिल्याने त्यांना होत असलेली मारहाण थांबली आणि त्यांचा जीवही वाचला.

 

पोलिसांशी संपर्क साधा
संशयित व्यक्ती आढळून आल्यास नागरिकांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क करणे आवश्यक आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये.  संशयितांना सुज्ञ नागरिकांनी जमावापासूनही दूर ठेवावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.

 

हेही वाचा, 
मालेगावातही मुले पळवणाऱ्या टाेळीच्या 'संशयाचे भूत'; जिंतूरच्या दांपत्याला बेदम मारहाण

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...