आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेकमुळे अपघात 1 ठार, 34 जखमी; मदत न करता बघ्यांनी काढले फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- लातूरहून परभणीकडे निघालेल्या बसने अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी शिवारात दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून अचानक आलेल्या गंगाखेड - पुणे बसला जोराची धडक दिली. या अपघातात लातूर बसचा चालक ठार झाला असून गंगाखेड बसचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी आठ वाजता घडला. अपघातानंतर घटनास्थळी परभणीहून लातूरकडे जाणाऱ्या बस चालकाने अपघातग्रस्त बसमधील जखमींना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. एसटीच्या अधिकाऱ्यांनी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात भेट देऊन जखमी प्रवाशांना तातडीची आर्थिक मदत दिली. या अपघातात काही बघ्यांनी मदत न करता केवळ मोबाइलमध्ये फाेटो काढल्याने माणसं किती असंवेदनशील झाली याचा प्रत्यय आला आहे. या अपघातात एसटीच्या तीन कर्मचाऱ्यांसह ३४ प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.


अंबाजोगाई येथील बसस्थानकातून गुरुवारी सकाळी अंबाजोगाई-दिग्रस ही बस बाहेर निघाली तेंव्हा या बसच्या पाठीमागेच लातूर-परभणी ही बसदेखील होती. सदरील बस परभणीच्या दिशेने निघाली होती. वाटेत वरवटी शिवारामध्ये दिग्रस बस समोरून येणाऱ्या वाहनास ओहरटेक करून पुढे गेली. परंतु त्या पाठोपाठ असणाऱ्या लातूर-परभणी बसला ओव्हरटेक करता न आल्याने समोरून येणाऱ्या गंगाखेड-पुणे बसवर धडक बसली. यात लातूर-परभणी बसचा चालक मारुती गोपीनाथ कातकडे जागीच ठार झाला. तर गंगाखेड-पुणे बसचा चालक एस. व्ही. आईलवाड हा गंभीर जखमी झाला. दोन्ही बसचे वाहक बाबासाहेब दिगांबर देवकते व मनीषा मारुती साळुंके हे अपघातामध्ये जखमी झाले. 


जखमींची नावे : दोन्ही बसच्या अपघातात कल्याण पतंगे, संभाजी सुरवसे, सूरज तरकसे, नारायण चौधरी, मनीषा चौधरी, बालाजी चौधरी (सर्व रा. सोनवळा ता. अंबाजोगाई) करण दहिफळे (रा.खो.सावरगाव), शारदा नागापूरकर, अविद्या जाधव,अजय देशमुख,खदीर शेख, प्रमोद राजमाने (सर्व रा.परळी), सुंदरराव देशमुख, भानुप्रताप सिंग (सर्व रा.अंबाजोगाई) सुंदर मेंडके (रा.मोरेवाडी), पूजा चव्हाण, गणपत चव्हाण (रा.मोहीखेड तांडा) ज्ञानेश्वर आघाव (रा.सारडगाव) दिलीप कुलकर्णी (रा.लातूर), निर्मलकुमार शहा (रा.पिंपळवाडा राजस्थान), शेख पाशामियाँ आजम (रा.वडवळ, ता.चाकूर), विठ्ठल मुंडे, गोविंद भाकरे (रा.वानटाकळी), सुभद्रा धोंडीराम केंद्रे (रा.उमराई), विनीत मिश्रा (रा.हैदराबाद), रमेश सातपुते (रा.लातूर), व्यंकटेश मोरे (रा.गंगाखेड), राजनंदिनी घनघाव (रा.गंगाखेड), काशीबाई कराड (रा.तांबवा), शेख सलीम शेख महेबूब शेख अक्तर शे.चुन्नुमियाँ (रा.लिंबा) जखमी झाले आहेत. 


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बीडचे डीसीएम जी.एम.जगतकर, ए.आर.पन्हाळे, यू.बी.वावरे, परभणीचे जे.एन.सिरसाट, पी.एम.जगताप, लातूरचे एस.बी.क्षीरसागर, अभय देशमुख आदींनी घटनास्थळाला भेट दिली. स्वाराती रुग्णालयातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत महामंडळातर्फे दिली जाणारी तातडीची मदत देण्यात आली. 

 

प्रवाशाच्या पोटात रॉड घुसला

वरवटी येथील दोन्ही बसच्या अपघातात जखमी झालेले प्रवासी शेख सलीम शेख महेबूब (रा.सोनपेठ) यांच्या तोंडाला व पोटामध्ये रॉड घुसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर स्वारातीच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...