आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केज तालुक्यात 2 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - कर्जमाफीचा अर्ज भरूनही यादीत नाव न आल्याने केज तालुक्यातील नांदूरघाट येथे शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला,  तर दुसऱ्या घटनेत कोरेगाव येथील शेतकऱ्याने  कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  

 
नांदूरघाट येथील शेतकरी ज्ञानोबा अर्जुन दोडके यांना एक   एकर नऊ गुंठे जमीन  असून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नांदूरघाट शाखेकडून ४६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मुलीच्या लग्नासाठीही हातउसने पैसे घेतले होते. अर्ज भरूनही कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव आले नव्हते. मागील महिन्यात ते  रोजगारासाठी पुण्याला गेले असता तिथेही काम मिळाले नाही म्हणून परत आले होते.  कर्जमाफीत नाव न आल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत  शेजारील  शेतकरी सटवाजी ढाकणे यांच्या शेतातील झाडाला  दोडके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुतण्या संभाजी हा शेतात  गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. शेतकऱ्याच्या  पश्चात  पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. 

 

तालुक्यातील कोरेगाव  येथे  शेतकरी मेघराज रामभाऊ घुले यांना दीड एकर जमीन  असून ते ऊसतोडणीचे काम करत होते.  केज येथील हैदराबाद बँकेचे  ८५ हजार कर्ज त्यांनी  घेतले होते. ऊसतोडणीची घेतलेली उचल न फिटल्याने त्यांच्याकडे पैसे फिरले होते. बँकेचे व्याज व मुद्दल, मुकादमाचे फिरलेले पैसे यामुळे कर्जाचा डोंगर वाढला होता.  या चिंतेतून घरातील आडूला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.  त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...