आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी जिल्हा बँकेसाठी वरपुडकर-बोर्डीकर गटांत चुरस ; मंगळवारी निवडणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार कुंडलिक नागरे यांच्या निधनाने बँकेच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी(दि.२४) निवडणूक होणार असून यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर विरुद्ध माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्षपदासाठी स्वतः वरपुडकर रिंगणात राहणार आहेत तर बोर्डीकर गटाकडून विजय जामकर हे उमेदवार राहतील.  


परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी एकत्रित असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या माजी आमदार बोर्डीकर गटाचा वरचष्मा आहे. त्यांच्याच पुढाकाराने अडीच वर्षांपूर्वी माजी आमदार  नागरे यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले होते. त्यावेळी वरपुडकर यांनी मोठी चुरस निर्माण केली होती. मात्र बोर्डीकर गटाकडे संख्याबळ मोठे असल्याने  नागरे अध्यक्ष झाले. मागील महिन्यात नागरे यांचे निधन झाल्याने अध्यक्षपदासाठी सहकार खात्याने निवड प्रक्रिया जाहीर केली. त्याच वेळी वरपुडकर हे जिल्हा बँक ताब्यात घेण्याच्या दृष्टीने सक्रिय झाले आहेत. त्यांनीही संचालकांची जुळवाजुळव सुरू केली आहे.  गेल्या २५ वर्षांपासून बोर्डीकर-वरपुडकर गटानेच सातत्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व राखले आहे. अधून-मधून सातत्याने या दोघांकडे  खुर्ची राहिली आहे. त्यामुळे दोघेही जिल्हा बँकेतील शह-काटशहाच्या राजकारणात मातब्बर आहेत. याहीवेळी संचालकांच्या फोडाफोडीची भूमिका दोन्ही गटांकडून जोरदारपणे राबवली जाईल. सद्यःस्थितीत १८ संचालक मतदानास पात्र असून त्यातील आपापल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न बोर्डीकर व वरपुडकर यांनी सुरू केला आहे. बोर्डीकर गटाकडून राष्ट्रवादीचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय जामकर यांचे नाव निश्चित असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदासाठीची निवडणूक चुरस निर्माण करणारी ठरेल.

 

 बोर्डीकर पेचात 

सध्या दोन्ही जिल्ह्यांचे २१ संचालक बँकेवर आहेत. त्यापैकी  नागरे यांचे निधन झाले आहे तर खुद्द बोर्डीकर यांनाही साडेसात कोटींच्या विमा घोटाळाप्रकरणी अद्यापही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परभणी शहरात येण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे ते सध्या अडचणीत आहेत.  याशिवाय आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याबाबतीतही सहकार खात्याने बजावलेल्या आदेशामुळे तेही मतदानास पात्र ठरतील की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र त्यांनी  औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल केलेली आहे. त्याचा निर्णय सोमवारी लागणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...