आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसरपंचाने पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडून शेतात घेतले पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटनांद्रा - चारनेर व चारनेरवाडी गावाशेजारील लघु मध्यम प्रकल्पात संपादित क्षेत्रातील विहिरीतून ग्रामपंचायतीद्वारे  पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याने गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडून त्यावर व्हॉल्व्ह बसवत स्वत:च्या शेतात पाणी घेतल्याचे ५० ते ६० महिलांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

 


 पाहणीत खुद्द उपसरपंच सोनाजी गाडेकर व ग्रामपंचायत सदस्य बासिद देशमुख यांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या  पाइपलाइनला दोन ते तीन ठिकाणी फोडून त्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसवले असून स्वत:च्या शेतीसाठी पाणी घेत असल्याचे  दिसून आले. 

 

त्यानंतर महिलांनी ग्रामसेवक शिंदे यांना प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पंचनामा करण्याचे सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी करत असलेल्या पाणी उपशावर  कारवाई करण्याच्या  मागणीचे निवेदन सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. दरम्यान, मी व आमच्या सदस्यांनी कोणत्याही प्रकारे पाण्याचा शेतीसाठी उपयोग घेतला नाही. संपादित क्षेत्रातील विहिरीतील अशुद्ध व गाळयुक्त पाण्याचा उपसा करण्यासाठी दोन विद्युत पंप बसवून अशुद्ध पाणी पाइपलाइनद्वारे नदीत सोडले. मी दोषी असल्यास कोणत्याही कार्यवाहीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे उपसरपंच सोनाजी गाडेकर यांनी सांगितले.

 

वरिष्ठांना माहिती देणार
गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन दुरुस्ती केली आहे.  चारनेरवाडीत पाणीपुरवठा सुरू केला. अशुद्ध व गाळयुक्त पाणी इतर ठिकाणी सोडण्याचे कर्मचाऱ्यास सांगितले होते. याविषयी वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-शिंदे, ग्रामसेवक. 

बातम्या आणखी आहेत...