आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिरसाळा - पोहता येत नसतानाही कालव्यात पोहायला गेलेले भानुप्रकाश (२२) व शुभम सिन्हा (२२) हे दोन शिक्षक वाहून गेले. ही घटना बुधवारी सायंकाळी सिरसाळा (ता. परळी) येथे घडली. गुरुवारी सकाळी दोघांचेही मृतदेह घटनास्थळापासून १० कि. मी. वर कालव्यावरील पुलाच्या भिंतीला अडकलेल्या अवस्थेत आढळून आले.
भानुप्रकाश आणि शुभम सिन्हा हे दोघेही मूळ दिल्लीचे रहिवासी आहेत. नोकरीच्या निमित्त ते सिरसाळ्यात होते. अंबाजोगाईत राहणारे भानुप्रकाश हे देवगिरी ग्लोबल अॅकॅडमी या इंग्लिश स्कूलवर तर शुभम सिन्हा हे माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील साई पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत होते. सिरसाळ्यापासून ३ किमीवरील गोवर्धन हिवरा येथून माजलगावहून येणारा जायकवाडीचा कालवा आहे. दोघेही बुधवारी दुपारी कालव्यात पोहण्यासाठी गेले होते.
कालव्यात पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ते एका रबरी नळीचा आधार घेत पोहत होते. यातील एकाचा हात निसटला. त्यास वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही शिक्षक वाहून गेला. त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी काही किलोमीटर अंतरावरील सबराबाद शिवारातील कॅनॉलच्या पुलाच्या भिंतीला अडकलेल्या अवस्थेत आढळून आले.
दुपारी ४ वाजता पोहायला गेलेले शिक्षक बऱ्याच अवधीनंतरही परतले नसल्याची माहिती देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमधील इतर शिक्षकांनी सिरसाळा पोलिसांना दिली. पोलिस कॉन्स्टेबल गंगावणे व राठोड यांनी घटनास्थळी पाहणी केली. बुधवारी रात्रभर शोधकार्य सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी १० किमीवर कॅनॉलच्या पुलाच्या भिंतीला अडकलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह आढळून आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.