आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगतापांवर आरोप करणाऱ्या पीडितेने मागितले15 लाख, स्वीकारले सात लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरोधातील विनयभंगाच्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी  मिळाली अाहे. जगताप यांच्या पत्नीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पतीवर आरोप करणाऱ्या त्या महिलेने आपल्या पतीकडे  १५ लाख रुपये मागितले व त्यापैकी साथीदारामार्फत सात लाख स्वीकारल्याचा आरोप केला आहे.

 

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पीडितेविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे.   दरम्यान, पीडितेने सर्व आरोप फेटाळून लावले असून खटल्यात दबाव आणण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचा प्रत्यारोप केला आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पत्नी उषा जगताप, नातेवाइक एन. के. कापसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.

 

यामध्ये त्यांनी पीडिता व त्यांच्या अन्य एका साथीदारावर  खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात माहिती सांगितली.  शहर पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उषा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १० एप्रिल रोजी रात्री ८.३० ते ९.०० वाजेच्या दरम्यान पीडिता व साथीदार राहुल नलावडे हे जगताप यांच्या घरी आले. दोघे उषा यांना म्हणाले की, १५ लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या पतीविरोधात बलात्कार व मानहाणीची केस करते, अशी धमकी दिली.

 

हा प्रकार दीर राजेंद्र जगताप व नातेवाइक विष्णू पायघन यांना प्रकार सांगितला. उषा यामुळे घाबरल्या होत्या. पती शिक्षणाधिकारी असल्यामुळे त्यांच्या नोकरी व प्रतिमेला बाधा येईल म्हणून पीडितेने खंडणी मागितली आहे, यामुळे दोघांना मध्यस्थी होऊन प्रकरण मिटवण्यास सांगितले. १२ एप्रिलला दुपारी एक वाजता दोघांना राहुल नलावडे पैसे घेण्यासाठी आला असल्याचे सांगितले. नातेवाइकांनी नलावडे याला दोघांनी सात लाख दिले. नलावडे याने बाकीचे पैसे द्या, अन्यथा साहेबांवर केस करू अशी धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर वारंवार धमकी देऊन खंडणीची मागणी केली.

 

सर्व आरोप खोटे 
उषा जगताप यांच्या आरोपांनंतर यासंदर्भात पीडितेशी  संपर्क साधून विचारले असता तिने सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले.  विनयभंगाची केस कमकुवत करण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्याच्या उद्देशाने हा कट रचला आहे. या अगोदर दुचाकीवरून पाठलाग केला. आता गुन्हा दाखल केला. १० एप्रिलला मी आनंदनगर पोलिस ठाण्यात होते. तेव्हा जगताप यांच्या घरी जाण्याचा प्रश्नच नाही. तसेच नलावडे याला मी ओळखतही नाही. यामध्ये माझी नाहक बदनामी होत असून मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. तसेच संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असे सांगितले. 

 

पुरावे असल्याचा दावा
पीडिता व नलावडे यांनी खंडणी मागितल्याची चित्रफीत व ध्वनीमुद्रण आहे. खंडणीची रक्कम घेऊनही दि. १६ एप्रिलला खोटी फिर्याद दिली आहे. अजूनही खंडणी मागितली जात आहे, मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तक्रार देण्यास विलंब झाला, अशा स्वरूपाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कसून तपासणी करा 
उषा जगताप म्हणाल्या की, दुचाकीवरून पाठलाग करून अंगावर थुंकण्यात आले, अशी फिर्याद पीडितेने दिली आहे. या प्रकरणाचीही  कसून तपासणी करावी. या दोन तरुणांचा आमचा संबंध नाही. घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्यातील फुटेज तपासावे. सचिन जगताप यांना जामीन  मिळण्यासाठी हे षड्यंत्र रचले गेले असू शकते. 


पोलिसांकडे मोबाइल 
मोबाइलवर संभाषण झालेली क्लिप तसेच यासंदर्भात नलावडे पैसे घेत असतानाची व्हिडिओ क्लिपही  पोलिसांकडे दिली असल्याचा दावा उषा जगताप यांनी केला आहे. यामध्ये खंडणी मागितल्याचे सर्व पुरावे आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी या क्लिपबद्दल काहीही सांगण्यात नकार दिला. 

 

आज जगताप न्यायालयात 

शिक्षणाधिकारी जगताप यांना शनिवारपर्यंत (दि. २६) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता शनिवारी  जगताप यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासंदर्भात न्यायालयात काय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...