आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातींचा सामाजिक प्रश्न आता राजकीय समस्या बनला; भय्याजी जोशी यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - देशात जातींचा प्रश्न पूर्वी सामाजिक होता. परंतु राजकीय पक्षांनी जातीचे राजकारण सुरू केल्यानंतर ती आता राजकीय समस्या झाली आहे. सध्या या समस्येमुळे निर्माण होणारी संकटे तात्कालिक असून समन्वय ठेवला तर त्यातूनही मार्ग निघू शकतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.  


लातूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माधव स्मृती या नूतन वास्तूचा गुरुवारी सायंकाळी लोकार्पण सोहळा झाला. यावेळी ते बोलत होते. देवगिरी प्रांत संघचालक गंगाधर तथा दादा पवार, लातूर विभाग संघचालक व्यंकटसिंह चव्हाण, जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथराव जाधव यांची या वेळी उपस्थिती होती.  


सर कार्यवाह भय्याजी जोशी पुढे म्हणाले की, संकुचितता वाढत असल्याने काही दुर्दैवी प्रसंग निर्माण होत आहेत. प्रांत,जात या बाबींवरून संकुचित मनोवृत्तीचे दर्शन होते आहे. जातींची रचना ही समाजाला दुर्बल करणारी असून भावनाही वाईट आहे. समाजात वाढत असणारी विषमता व भेदभाव घातक आहे. यामुळेच जात कोणीतीही असो ती मनात ठेऊन आपण हिंदू आहोत असे म्हटले तर सर्वच प्रश्न संपून जातील. संकुचितता हे आज मोठे आव्हान आहे. या माध्यमातून सामाजिक अंतराला राजकीय स्वरूप प्राप्त होत असून त्यामुळे प्रश्न सुटत नाहीत, असेही भैय्याजी म्हणाले.  


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर्क किंवा चिंतनावर काम करीत नाही. तर त्यासाठी भावात्मक शक्ती गरजेची असते असे सांगून गेल्या ९२ वर्षापासून विशेष लक्ष ठेऊन संघ काम करत असल्याचे ते म्हणाले. देशातील सर्व हिंदू स्वतःला हिंदू म्हणवून घेत नाहीत, हे दुर्देव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही चालत नाही 
लोकशाही ही सर्वात चांगली व्यवस्था आहे. परंतु त्या नावाने हुकूमशाही चालत नाही. भारतात लोकशाही यशस्वी झाली असून त्याचा गैरफायदा काहीनी घेतला पण तो फार काळ टिकत नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणे या देशातील समाजाच्या रक्तातच आहे. शेकडो संप्रदाय येथे राहतात पण त्यांच्यात कधीही संघर्ष होत नाही.  भारताला भारत म्हणून टिकवण्याचे काम करावयाचे आहे. भारताची भूमिका जगाला मार्गदर्शन करणारी आहे, असेही जोशी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...