आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजेगावात दोन गटांत दंगल, वस्तीवर हल्ला, 3 तास दगडफेक, बसही फोडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- एका पोस्टरवर काही तरुणांनी आपल्या समाजाचा झेंडा लावल्यावरून रविवारी  सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे दोन  गटांत संघर्ष उफाळला. एका गटाने दुसऱ्या  गटाच्या वस्तीवर हल्लाबोल केला. त्यानंतर  सुमारे तीन तास दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक सुरू झाली.  सुमारे तीन चालू असलेली दगडफेक पोलिस पोहोचल्यावरच थांबली आणि वाद काहीसा निवळला. तथापि हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचल्याने आजेगावात तणावपूर्ण शांतता आहे. 


आजेगाव येथे हिंगोली रस्त्यावर १२ जानेवारी रोजी फलक लावून त्यावर एक झेंडा लावला होता. या झेंड्याच्या शेजारीच १३ जानेवारीला दुसऱ्या एका गटाने आपला झेंडा रोवला. ही बाब रविवारी सकाळी निदर्शनास येताच  सकाळी ७ वाजल्यापासून एका समाजातील तरुणांकडून दुसऱ्या समाजातील तरुणांच्या वस्तीवर दगडफेकीस सुरुवात झाली.   या तरुणांच्या टोळक्याने एका चौकातील स्तंभ तोडून टाकला.  तसेच एका प्रार्थनास्थळावरही प्रचंड दगडफेक करीत त्याचा दरवाजा आणि काचा फोडून टाकल्या. गावातील दुसऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही जशास तसे उत्तर देत विरोधी गटाला लक्ष्य केले. ही दगडफेक  तीन तास चालू होती. परंतु गावात एका समाजाची संख्या जास्त असल्याने त्यांनी दुसऱ्या समाजाच्या वस्तीत  धुडगूस घातला.   


सकाळी ९ वाजता काही तरुणांनी  रिसोड डेपोची बस (क्र. एमएच ४०- ८५३१)  फोडून टाकली. सकाळची ९.३० च्या सुमारास गोरेगावचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, हिंगोली ग्रामीणचे पीआय  जगदीश भंडारवार हे दाखल झाले. त्यानंतर सेनगावच्या तहसीलदार वैशाली पाटील या सुद्धा दाखल झाल्या आणि नंतर दोन्ही समाजातील वाद निवळण्यास सुरुवात झाली. तहसीलदार वैशाली पाटील व पोलिस अधिकाऱ्यांनी गावात शांतता समितीची  बैठक घेतली. परंतु काही तरुणांनी गावात दंगल भडकाविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकून गोरेगाव पोलिस ठाणे गाठले. प्रकरण पोलिसांत गेल्याने गावातील तणाव कायम असून गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबत गोरेगाव पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीवर सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

बातम्या आणखी आहेत...