आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांवर जात पंचायतीचा बहिष्कार; जात पंचायतीवर कारवाईची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- मुलाच्या लग्नात जात पंचायतीच्या पंचांना मानपान दिला नसल्याच्या कारणावरून येथील जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल कुटलिया यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर गवळी समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कार घातला आहे. ही माहिती खुद्द जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. याप्रकरणी यादव यांनी जात पंचायतीतील पंचांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाची तक्रार नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.   


यादव हे नांदेड येथे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत.  १० डिसेंबर २०१७  रोजी त्यांच्या मुलाचे लग्न होते.  समाजातील पंचांना मानाच्या पानाचा विडा व सत्काराचे साहित्य देऊन त्यांचा मान सन्मान करण्याची परंपरा आहे. मात्र या लग्नात पंचांचा उचित मान सन्मान झाला नसल्याचा पंचायतीचा आक्षेप होता. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडल्यानंतर ११ डिसेंबर रोजी इतवारा येथील हनुमान मंदिरात जात पंचायत बोलावण्यात आली. या जात पंचायतीत पंचासह समाजातील सुमारे दीडशे लोक उपस्थित होते. या जात पंचायतीस गंगालाल यादव व त्यांचे बंधू मोहनलाल यादव यांना बोलावण्यात आले होते. जात पंचायतीत गंगालाल यादव व मोहनलाल यादव यांना पंचांनी लग्नात आमचा मान सन्मान केला नाही, मानाचा पानाचा विडा दिला नाही, असे सांगून तुम्हाला समाजातून बहिष्कृत करण्यात येत असल्याचे सांगून  पंचायतीत अपमान करून उठून जाण्यास सांगण्यात आले. दरम्यान, या भावंडांनी जात पंचायतीत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना पंचायतीतून हाकलून लावले.   
शेजाऱ्यानेही डावलले : गवळीपुरा या भागात १२ डिसेंबर रोजी गंगालाल यादव यांच्या समाजात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भातावाले कुटुंबाकडे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी भातावाले यांनी समाजातील सर्वांना बोलावले. मात्र, गंगालाल यादव यांना  बोलावले नाही.  

 

ही कुप्रथा बंद झाली पाहिजे   
यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जात पंचायत आणि बहिष्कार ही कुप्रथा बंद झाली पाहिजे. माझ्यासारख्या अधिकाऱ्यालाही या प्रथेचा त्रास होत आहे. सर्वसामान्यांचे तर काय होत असेल. माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर टाकण्यात आलेल्या सामाजिक बहिष्काराबद्दल मी रीतसर पोलिसांकडेही तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही, केवळ तपास सुरू असल्याचे पोलिस सांगतात. पोलिसांनी यावर कारवाई न केल्यास मला नाइलाजाने न्यायालयात जावे लागेल, असेही गंगालाल यादव यांनी सांगितले.

 

पोलिसांत तक्रार   
अगोदरच जात पंचायतीत अपमान झालेले गंगालाल यादव यांनी आपल्याला जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले असून जात पंचायतीच्या पंचांवर कारवाई करण्याची मागणी १३ डिसेंबर रोजी  इतवारा पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीच्या प्रती त्यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनाही दिल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षकांना एक पत्र देऊन या तक्रारीची चौकशी करून तातडीने उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले.    

 

चौकशीनंतर कारवाई
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. चौकशीनंतरच कारवाई करण्यात येईल. 
शिवाजीराव डोईफोडे, सहायक पोलिस निरीक्षक, इतवारा ठाणे.

बातम्या आणखी आहेत...