आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धनग्नावस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, अतिप्रसंग झाल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- वाळूज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी येथील गट नंबर १८३ येथील भंगाराच्या गोडाऊनलगत अर्धनग्नावस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह १८ एप्रिल रोजी सकाळी आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अधिक तपास करण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसराला व जोगेश्वरी गावाला लागून असणाऱ्या जोगेश्वरी गट नंबर १८३ मध्ये एक्सलंट नावाची कंपनी आहे. मात्र, या 'जागेचा वापर भंगार गोडाऊन म्हणून केला जातो'. १८ एप्रिल रोजी पहाटे ५.४० वाजेच्या सुमारास लगतच असणाऱ्या ए.एस.इंडस्ट्रीज येथील सुरक्षा रक्षकाची पत्नी नेहमीप्रमाणे कंपनी परिसरात फेर फटका मारण्यासाठी बाहेर पडली असता त्यांना शेजारील गोडाऊनलगत रस्त्याच्या कडेला अंदाजे ३५ ते ४० वर्षीय महिला रक्ताळलेल्या अवस्थेत तसेच अर्थनग्नावस्थेत निपचित पडून असल्याचे आढळले. 


दरम्यान, त्यांनी घटनेची माहिती परिसरातील एका शेतकऱ्याला दिली. शेतकऱ्याने ही माहिती स्थानिक ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधींना दिली. पुढे ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी फौजदार अमोल देशमुख, लक्ष्मण उंबरे, पोलिस हेडकाॅन्स्टेबल बाळासाहेब आंधळे, रामदास गाडेकर, देविदास इंदोरे, बाळासाहेब काकडे, शैलेंद्र अडियाल आदींनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला तत्काळ घाटीत रवाना करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांत घेण्यात आली आहे. 


महिलेवर अतिप्रसंग झाल्याचा संशय 
घटनास्थळी धावलेल्या पोलिसांना अर्धनग्नावस्थेतील महिला आढळून आली. डाव्या डोळ्यावर, उजव्या गालावर जखम तसेच गळा आवळल्याचे स्पष्ट व्रण गळ्याभोवती दिसत असल्यामुळे या महिलेचा खून गळा आवळून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस निरीक्षक साबळे यांनी वर्तवला असून महिलेसोबत अतिप्रसंग झालेला आहे किंवा नाही याबाबत खुलासा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी दिव्य मराठीला सांगितले. 


महिला परप्रांतीय असावी? 
घटनास्थळी आढळून आलेली जांभळ्या रंगाची साडी, जांभळे ब्लाऊज, कपाळावर गोंदलेले तसेच कपाळावर लाल रंगाची उभी टिकली, पायामध्ये जाड पैंजण, पायांच्या बोटाला जांभळ्या रंगाचे नेलपॉलिश लावलेल्या महिलेचा पेहराव व चेहऱ्याची ठेवण पाहता ही महिला दक्षिण भारतीय असल्याचा अंदाज वाळूज पोलिसांकडून तसेच जमलेल्या, उपस्थित बघ्यांच्या गर्दीतून वर्तवण्यात येत आहे. 


माहिती देण्याचे केले आवाहन 
सदरील घटनेबद्दल तसेच मृत महिलेबाबत कोणाकडे काही माहिती असेल तर थेट पोलिस निरीक्षक यांच्याशी किंवा वाळूज एमआयडीसी ०२४०-२२४०५५९ या क्रमांकावर फोन करून माहिती देण्याचे आवाहन निरीक्षक साबळे यांनी नागरिकांना केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो...

बातम्या आणखी आहेत...