आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगी कारखाना मी आणला; पूजन टिकोजीरावांनी केले! उद्योगमंत्री देसाई यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूरला रेल्वे बोगी कारखाना आपण उद्योगमंत्री या नात्याने मंजूर करवून घेतला. यामध्ये भाजपच्या स्थानिक तसेच राज्यपातळीवरील कोणत्याही नेत्याचे श्रेय नाही. मात्र आपण मंजूर केलेल्या या कारखान्याचे भूमिपूजन टिकोजीरावांनी केले, अशी जळमळीत टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी येथे केली. उदघाटन कोणीही का करेना त्याची फिकीर न करता भविष्यात या रेल्वे कारखान्यातील कर्मचारी भरती आपल्याच खात्यामार्फत होणार असा दावाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. गुरुवारी लातूर येथे झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. खासदार चंद्रकांत खैरे, सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती. 


लातूर येथे रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे डबे बनवण्याचा कारखाना उभारण्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. ३१ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. गेल्याच महिन्यात ३५० कोटी रुपयांची विविध कामे करण्याची निविदाही रेल्वे मंत्रालयाच्या प्रकल्प उभारणी खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यामुळेच हा कारखाना लातूरला होऊ घातल्याचे सांगत भाजपने त्याचे श्रेय घेतले होते. मात्र आजपर्यंत याबद्दल एकदाही वक्तव्य न केलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी लातूरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात लातूरचा कारखाना आपणच मंजूर करवून घेतल्याचे सांगितले. तो कारखाना इतरत्र जाऊ नये म्हणून आपण त्याची जाहीर वाच्यता केली नव्हती. मात्र पुढे भाजपच्या मंडळींनी तो आपणच आणल्याचा गवगवा केला. टिकोजीरावांनी तर थेट कारखान्याचे भूमिपूजनही केले. मी ऐकले आहे की भाजपची स्थानिक मंडळी कारखान्यात आपणच भरती करणार असल्याचे सांगत आहे. पण या कारखान्यातील कर्मचारी भरती रेल्वे खाते आणि उद्योग मंत्रालयामार्फतच होणार आहे, असेही सुभाष देसाई म्हणाले. 


दरम्यान , एमआयएमचा बंदोबस्त करण्यााची ताकद केवळ शिवसेने मध्ये आहे. अर्धी चड्डी घालणाऱ्यांना हे शक्य नाही, असा टोलाही देसाईंनी लगावला. 


गुंडगिरी वाढली 
दरम्यान, या मेळाव्यात शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्थानिक राजकारण्यांमुळे लातुरात गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला. त्याचबरोबर राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचे आपल्या कानावर आले असून शिवसैनिकांनी त्यात लक्ष घालावे. शिवसेना स्टाइलने त्यांना वठणीवर आणून शेतकऱ्यांना कर्ज मिळवून द्यावे, असेही खैरे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...