आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; निवृत्तीनाथांच्या द्वारी, स्वच्छतेची वारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त लाखो वारकरी दाखल झाले अन् नाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन गावोगावी परतले. विठुमाउली व निवृत्तिनाथांचा नामगजर, त्याला टाळ-मृदंगाची साथ देत शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरी वाटचाल करीत असतात. साधारणपणे तीन ते चार दिवसांच्या या काळात नाशिकसह राज्यभरातील ज्या भागातून दिंड्या त्र्यंबकेश्वराच्या दिशेने कूच करतात त्या परिसरातील रस्ते वारकऱ्यांमुळे तसेच रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या दिंड्यांमुळे फुलून गेलेले असतात. ठिकठिकाणच्या मैदानांवर आयोजित रिंगण सोहळे, अश्वांच्या फेऱ्या अन् वारकऱ्यांची मांदियाळी यामुळे सारा आसंमत निवृत्तिनाथमय झालेला असतो. असे एकूण सगळे वातावरण भक्तिभावाने भारावलेले असताना त्र्यंबकनगरीसह पंचक्रोशीत यात्रेनंतर अर्थात वारकऱ्यांच्या प्रस्थानानंतर जी प्रचंड अस्वच्छता दिसते, तो एक चिंतेचा विषय मागे उरतो. नेमकी ही बाब या वेळी संस्थान व वारकऱ्यांच्या संघटनांनी लक्षात घेत स्वच्छतेच्या कामातही आपण तसूभर मागे राहायचे नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे सुमारे अडीच हजार वारकरी व स्वयंसेवकांनी स्वच्छतेसाठी कंबर कसली अन् अवघी त्र्यंबकनगरी स्वच्छ करवून दाखवली. शेकडो वर्षांची यात्रेची परंपरा असलेल्या या वेळच्या यात्रेतील हे वेगळेपण ठळकपणे आवर्जून नमूद करता येऊ शकेल.  


श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व नाशिकला दर बारा वर्षांनंतर सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून जवळपास दीड ते दोन कोटींच्या आसपास भाविक दोन्ही ठिकाणी भेटी देत असतात. तीन प्रमुख पर्वण्यांचा पापक्षालनाचा काळ सोडला तर भाविकांची अन् पर्यटकांची वर्दळ ही वर्षभर सुरूच राहते. सिंहस्थाच्या काळात त्र्यंबकेश्वरी दाखल होणाऱ्या शैव अर्थात नागा साधूंच्या दर्शनाचा योग साधण्यासाठी येणाऱ्या भाविकांची वा पर्यटकांची संख्या अगणित असते. त्याव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वराला ज्योतिर्लिंगामुळे पौराणिक व अाध्यात्मिक स्थानमाहात्म्य आहेच. त्यामुळे तेथेही भाविकांची वर्षभर ये-जा सुरू असते. ही एकूण पार्श्वभूमी येथे विशद करायचे कारण असे की, एवढ्या प्रचंड संख्येने भाविक अन् पर्यटक नाशिकनगरीमध्ये येत असतील तर या ठिकाणांच्या स्वच्छतेचा प्रश्न किती गंभीर असू शकेल वा त्यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर तो भविष्यात स्थानिकांबरोबरच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक ठरू शकतो याकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे हाच त्यामागचा स्पष्ट उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा असो की कुंभमेळा, ज्या ठिकाणी एकाच दिवशी वा महिना-दोन महिन्यांच्या कालांतरात लाखोंच्या संख्येने भाविक एकत्र येत असतील तर त्यांच्या मलमूत्रापासून दैनंदिन व्यवस्थेशी संबंधित आरोग्याचे असंख्य प्रश्न भेडसावू शकतात. असे प्रश्न निर्माण होऊ नयेत, स्थानिकांचे तसेच भाविकांचे आरोग्य उत्तम राहावे, देवदर्शनासोबतच परिसर स्वच्छ राहावा, त्यायोगे तीर्थस्थळाचे पावित्र्य राखले जावे अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरी परतणारा भाविक कोणताही साथीचा रोग घरापर्यंत घेऊन जाणार नाही याची काळजी घेतली जावी. श्री संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त वारकऱ्यांनी व संस्थानने नेमक्या याच संवेदनशील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून यंदा प्रथमच यात्रेनंतर अवघी त्र्यंबकनगरी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच पंढरपूरला आषाढी एकादशीला झालेल्या दिंडी सोहळ्यानंतर निर्मळवारीच्या कल्पनेला मूर्त रूप दिले होते. परंतु त्र्यंबकेश्वरी वारकऱ्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे एक नवीन पायंडा पडू पाहतो आहे असे म्हणण्यास वाव आहे. यंदा साडेपाचशे पालख्या येथे दाखल झाल्या होत्या. प्रत्येक पालखीमध्ये कमीत कमी तीनशे ते चारशे वारकरी आबालवृद्ध, महिला व पुरुष यांचा समावेश असतो. प्रत्येक पालखीतील किमान पाच लोकांनी स्वच्छता राखण्याकामी पुढाकार घेतला तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शेकडो वारकरी या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. कुठल्याही सरकारी यंत्रणेपेक्षा वारकऱ्यांची ही फौज आपापला परिसर स्वच्छ राखण्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. हेच त्र्यंबकेश्वरी आलेल्या वारकऱ्यांनी सिद्ध केले. संत निवृत्तिनाथ संस्थानच्या विश्वस्तांचेही कौतुक करायला हवे, कारण त्यांच्याकरवी प्रत्येक पालखीच्या संयोजकांना आपापला आवार स्वच्छ ठेवण्याबाबत आग्रहाचे आवाहन प्रत्यक्ष यात्रा सुरू होण्यापूर्वीच केले होते. निवृत्तिनाथाच्या द्वारी, स्वच्छतेची वारी अशीच अखंडितपणे सुरू राहावी हीच अपेक्षा.  


- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...