आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी दरबारात सुवासिनींनी लुटले वाण; पुरुषांना तासभर मंदिर प्रवेश बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर- मकरसंक्रांतीनिमित्त रविवारी (दि.१४) तुळजाभवानीच्या दरबारात हजारो सुवासिनींनी सौभाग्याचे वाण लुटले. पहाटेपासूनच महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पाच ते सहादरम्यान एक तासासाठी पुरुषांना मंदिर प्रवेश बंद करण्यात आला होता. संक्रांतीनिमित्त महिलांना दिवसभर थेट गाभाऱ्यातून देवी दर्शनाची व्यवस्था मंदिर संस्थानने केली होती.  


रविवारी पहाटे एक वाजता चरणतीर्थ पूजा झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारनंतर गर्दीत वाढ झाली. दर्शनरांगा दिवसभर महिलांच्या गर्दीने फुलल्या होत्या. शहरासह बाहेरगावच्या महिलांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. संक्रांतीच्या दिवशी सुवासिनींनी सौभाग्याचे लेणे हळदी-कुंकवासह इतर साहित्य वाण म्हणून लुटले. वाण लुटण्यासाठी मंदिरात ठिकठिकाणी महिलांनी गर्दी केली होती. तुळजाभवानी मंदिरातील प्रचंड गर्दीमुळे काही महिलांनी तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतले. 


निझामकाळापासून पुरुषांना प्रवेश बंद    
महिलांचा पारंपरिक सण मकरसंक्रांतीनिमित्त सायंकाळी पाच ते सहादरम्यान एक तास पुरुषांसाठी मंदिर प्रवेश बंद करण्यात येतो. ही परंपरा निझाम शासनाच्या काळापासून चालत आली आहे. यासंदर्भात निझाम सरकारचे ‘१२९६ फसली’ या सालातील पत्रही  आहे.  

बातम्या आणखी आहेत...