आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारपूस न करता कांबळे गेले; हिंगोलीत 'आणीबाणी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- आणीबाणीत तुरुंगवास भोगावा लागलेले, पोलिस केसेस झालेल्या स्वातंत्र्यसैनिक दर्जाचे ज्येष्ठ नागरिक येथील विश्रामगृहात पालकमंत्री दिलीप कांबळे यांचे आभार मानण्यासाठी आले खरे; परंतु पालकमंत्र्यांनी त्यांची साधी विचारपूसही केली नसल्याने हे नागरिक चांगलेच संतापले. त्यांनी भाजपविरोधात कडक प्रतिक्रिया व्यक्त दिल्या. 

 

पालकमंत्री दिलीप कांबळे हे रविवारी येथे शेतकरी दिन आणि वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आले होते. सकाळी १० वाजता येण्याची वेळ असताना पालकमंत्री दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आले. तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणीबाणीत जेलमध्ये गेलेले, पोलिस केसेस झालेले आणि पोलिसी अत्याचाराला बळी पडलेले सुमारे ३० जण येथील विश्रामगृहात सकाळी १० वाजल्यापासूनच ठाण मांडून बसले होते. पालकमंत्री आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी थेट विश्रामगृहात व्हीआयपी सूटमध्ये गेले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ठिकठिकाणचे आमंत्रण देण्यासाठी बरेचसे अधिकारी आल्याने पालकमंत्र्यांना बाहेर निघण्यास १ वाजला. 


पालकमंत्री कसेबसे बाहेर निघाले तेव्हा, काही जणांचे सत्कार घडवून आणले गेले आणि नंतर डीपीडीसीची बैठक चालू होण्याचा निरोप धडकताच पालकमंत्री आपल्या ताफ्यासह निघून गेले. तर स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा दिल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी बाहेर सुमारे २ तासांपासून ताटकळत बसलेल्या आणीबाणीतील स्वातंत्र्यसैनिक दर्जाच्या ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले. आवाज देऊनही पालकमंत्री निघून गेल्याने हे ज्येष्ठ चांगलेच संतापले. 


स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जाच का दिला? 
ज्यांनी आणीबाणीच्या काळात अत्याचार सहन केले, जेलमध्ये जाऊन मरणयातना भोगल्या त्यांची साधे दोन शब्द बोलून कदर करणे होत नसेल तर आम्हाला स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जाच कशाला दिला? आम्ही आवाज देत होतो आणि साहेब पुढे निघून जात होते. याला माणुसकी म्हणतात काय? केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी या सरकारने आम्हाला स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जाच दिला. 
- मारोतराव खांडेकर, रा. जांभरून, ता. कळमनुरी. 


मानधनापेक्षा आम्हाला मान महत्त्वाचा 
आम्हाला शासनाने किती रुपये मानधन जाहीर केले आहे, त्यापेक्षा आमचा म्हणजेच सामान्य माणसाचा मान राखावा अशीच आमची अपेक्षा आहे. आम्ही पालकमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांच्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी आलो होतो. परंतु त्यांनी आमची दखलच घेतली नाही. 
- रामराव जाधव, स्वातंत्र्यसैनिक संघटना अध्यक्ष, परभणी. 

बातम्या आणखी आहेत...