आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैधव्याचे दुःख बाजूला सारत विधवांना दिले साड्यांचे वाण!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवगण राजुरी- एकमेकांना तिळगूळ  देत गोड बोलण्याच्या शुभेच्छा देणारा  संक्रांतीचा सण मात्र समाजात वैधव्याचे दु:ख सोसणाऱ्या माहिलांना दुर्लक्षित करूनच साजरा केला जातो. मात्र,  स्वत: वैधव्याचे दु:ख सोसणाऱ्या महिला शिक्षिकेने परिसरातील इतर विधवांना साड्यांचे वाण भेट देत सक्रांतीचा सण साजरा केला.  


मकरसंक्रांत प्रामुख्याने सुवासिनींचा सण म्हणूनच  साजरा केला जातो. सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. एकमेकींना वाण देतात. मात्र, नियतीच्या खेळामुळे नशिबी वैधव्य आलेल्या महिला मात्र या वेळी आपले दु:ख व्यक्तही करू शकत नाहीत. काकडहिरा (ता. पाटोदा) येथील रहिवासी आणि बीड तालुक्यातील लिंबारुई प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या मनीषा जायभाये (ढाकणे) यांनी मात्र स्वत:चे वैधव्याचे दु:ख बाजूला सारून परिसरातील ८५ महिलांना संक्रांतीनिमित्त सन्मानपूर्वक साड्यांचे वाटप करून अनोखे वाण दिले.  


मनीषा यांचे पती रामकिसन जायभाये हे  भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. २००६ मध्ये सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर कुटुंबीयांसह ते बीडमध्ये राहण्यास आले. सर्व काही सुरळीत असताना २००९ मध्ये रामकिसन यांचा अपघाती मृत्यू झाला आणि मनीषा यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. अकाली वैधव्याने त्या खचल्या.  प्रथा, परंपरा पाळताना अनेकदा विधवांना  महत्त्वाच्या कार्यक्रमात, सणोत्सवात सहभागी होता येत नाही हे पाहून त्यांनी अशा महिलांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण देण्याचा प्रयत्न केला. संक्रांतीला परिसरातील विधवांना साडी वाटपाचा मानस त्यांनी कुटुंबीयांना सांगितला. सर्वांनीच पाठिंबा दिला अन् रविवारी ८५ विधवा महिलांना संक्रांतीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी  सत्यभामा बांगर, काकडहिराचे सरपंच महादेव जायभाये, सूर्यकांत जोगदंड, प्रतिभा हावळे यांची उपस्थिती होती.  


समाजाने आदर करावा  
समाजात विधवांना मानाचे स्थान मिळावे. सणाेत्सव व इतर कार्यक्रमांत आदराची वागणूक मिळावी या हेतूने हा उपक्रम राबवला. रूढी-परंपरा जोपासताना आमचाही विचार केला गेला पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे. - मनीषा जायभाये, शिक्षिका  

बातम्या आणखी आहेत...