आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैठणा येथे कन्येच्या लग्नाच्या पूर्वसंध्येलाच पित्याचा खून; पूर्ववैमनस्यातून हत्‍येचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी- कन्येच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला(शनिवारी) पित्याचा खून झाल्याचा प्रकार परतूर तालुक्यातील दैठणा शिवारात उघडकीस आला. शेख मुनवर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव अाहे. तो परतूर तालुक्यातील वरफळवाडी शिवारातील रहिवासी आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सहा आरोपींना अटक केली आहे.  


मृत मुनवर यांचे बंधू शेख सरवर शेख नूर यांनी आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मृत शेख मुनवर (४०, वरफळवाडी, ता. परतूर) हे विहीर खोदकामाची कामे घेत होते. त्यांच्याकडे क्रेन व काही लेबर आहेत. मुनवर हे शुक्रवारी रात्री घरी आले नाही म्हणून घरच्यांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. यासंदर्भात मुनवर यांचा मित्र ज्ञानेश्वर विश्वनाथ आढाव यांच्याकडे चौकशी केली असता रमेश तायडे यांनी ८ फेब्रुवारी रोजी आपल्याला व शेख मुनवर यास फोन करून दैठणा येथे जेवणाचे निमंत्रण दिले होते. या वेळी ७ लोक जेवणासाठी उपस्थित होते. त्या वेळी तायडे याने पाणी न मिसळता मद्यप्राशन करण्यास सांगितले. मात्र आपण नकार दिला तेव्हा तायडे याने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याने आपण तेथून मोटारसायकल घेऊन पळून आलाे.  दरम्यान, मुनवर तेथेच थांबला होता. त्यामुळे तेथे काय झाले हे आपणास माहिती नाही, असे ज्ञानेश्वर आढाव यांनी सांगितले. दरम्यान, मुनवर यास त्याच्याबरोबर असलेले लोक बळजबरीने दारू पिण्यास सांगत होते. मात्र, मुनवर त्यास विरोध करत होता. दरम्यान, याप्रकरणी आपण मुनवर यांचा मेहुणा शेख इस्माईल आदींना सोबत घेऊन दैठणा शिवारात चौकशी केली असता मुनवर यास मारून विहिरीत टाकले. रमेश तायडे व त्याच्यासोबतच्या इतर लोकांनीच हे कृत्य केल्याचे शेख सरवर शेख नूर यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, शेख सरवर, शेख अन्वर, शेख अफसर हे मृत शेख मुनवराचे बंधू असून वरफळवाडी येथील एका वाड्यात राहत होते.  मुनवर यांची कन्या रुख्सानाचा रविवारी विवाह होता.  

 

सहा जणांना अटक   
पोलिसांनी सखाराम रामचंद्र खरात, शिवाजी कळाळू सोळंके, सिद्धार्थ मंुगाजी शेजूळ, बद्रीनारायण दौलत पारखे, अंगद रामभाऊ ठोंबरे, रमेश रखमाजी तायडे या सहा लोकांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...