आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकीवर पाणी सोडले, तरी होतेय कराडांची कोंडी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- विधान परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या शब्दाखातर ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यामुळे राष्ट्रवादीची गोची होऊन हा मतदारसंघ भाजपाला मिळाला. मात्र रमेश कराडांची भाजपात कोंडी करण्याचे धोरण सुरूच असून रेणापूर तालुकाध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजपत पुन्हा सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.  


सुमारे तीन महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून गंगासिंह कदम यांची निवड करण्यात आली होती. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रमेश कराड यांचे निकटवर्तीय असलेल्या गंगासिंह कदम यांची निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी  जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांना सांगून कदम यांची निवड रद्द करण्याची सूचना केली. त्याबरहुकूम कदम यांची निवड रद्द झाल्याचे पत्र निडवदे यांनी जारी केले. त्यावरून रमेश कराड आणि निलंगेकर यांच्या गटात धुसफूस सुरू होती. पुढे तो निर्णय तसाच अनिर्णीत राहिला. मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. 


रमेश कराड यांनी भाजपातील अंतर्गत मतभेदाला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारीही दिली. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी शब्द टाकल्यानंतर ते पुन्हा माघारी फिरले. लातूर ग्रामीण या मतदारसंघात रमेश कराड यांचा सन्मान राखला जाईल असाही शब्द त्यांना देण्यात आला होता. सध्या ते भाजपात असले तरी अद्याप पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावर आलेले नाहीत. परंतु रेणापूर आणि लातूर तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे रमेश कराड यांना मानणारे असल्यामुळे त्यांनाच नेता मानतात. रमेश कराड राष्ट्रवादीत गेल्यानंतर पूर्वी तालुकाध्यक्ष म्हणून निवड झालेले गंगासिंह कदम मात्र भाजपातच राहिले होते. त्याच काळात ते पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जवळ गेले. आठ दिवसांपूर्वी निलंगेकर, निडवदे यांच्या उपस्थितीत रेणापूर तालुकाध्यक्ष निवडीसाठीची बैठक झाली. त्यामध्ये निलंगेकरांनी गंगासिंह कदम यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली. त्याला रमेश कराड यांना मानणाऱ्या भाजपाच्या जिल्हा परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती, सोसायट्या आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. विरोधी घोषणा देत त्यांनी सभागृह सोडले.

बातम्या आणखी आहेत...