आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार विक्रेत्याने वीज कार्यालयात घेतले विष; बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- वीज जोडणीसाठी  कोटेशन व पैसे भरूनही केवळ तात्पुरत्या स्वरूपात लाइनमनने  वीज जोडणी दिली. मात्र, महावितरणच्या पथकाने छापा मारून ही वीज जोडणी अनधिकृत ठरवत ती तोडली. यामुळे वैतागलेल्या एका वीज ग्राहकाने थेट महावितरणच्या कार्यालयातच विष  प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बीड शहरात शनिवारी भर  दुपारी  बारा वाजता घडली. 


अनिस शेख हे शहरातील अचानकनगर भागात राहतात. भंगार गोळा करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात कायम वीज जोडणी करण्यासाठी त्यांनी परिसरातील लाइनमनकडे मीटरच्या कोटेशनचे पैसेही भरले होते. यानंतर लाइनमनने त्यांना कायम जोडणी मिळेपर्यंत तात्पुरती वीज जोडणी करून दिली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या पथकाने केेलेल्या तपासणीत अनिस यांची वीज जोडणी अनधिकृत ठरवत ती तोडून टाकली. दोन दिवस अनिस यांनी पैसे भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याने पाठपुरावा केला.  मात्र, जोडणी मिळाली नाही. वैतागून त्यांनी शनिवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान महावितरणच्या  बीड शहरातील बार्शी नाका कार्यालयात जाऊन विष घेतले. त्यांना नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वार्ड क्रमांक सहामध्ये उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

 

पावती दाखवावी

“दिव्य मराठी’ने बीड येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जर त्या भंगार विक्रेत्याने वीज जोडणीसाठी कोटेशन भरले असेल तर त्याने पावती दाखवली पाहिजे. कोटेशन भरूनही जर वीज जोडणी मिळत नसेल तर मी या प्रकरणी चौकशी करतो. या प्रकरणी कनिष्ठ अभियंत्याकडून माहिती मागवण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...