आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबाद: अधिकारी न आल्याने पाण्यासाठीचा रास्ता रोको चिघळला; बसवर दगडफेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतप्त नागरिकांनी वेरूळ नाक्यावर सकाळी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. - Divya Marathi
संतप्त नागरिकांनी वेरूळ नाक्यावर सकाळी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

खुलताबाद - शहराला रोज बारा लाख लिटर पाण्याची गरज असताना आजमितीस जिल्हाधिकाऱ्यांनी खुलताबाद शहरास आठ टँकरने पाणीपुरवठ्याला मंजुरी दिली होती. त्यात पालिका शहरात १५ दिवसाआड पुरवठा करते. गावात सध्या आठ टँकर सुरू असून हे पाणी शहरवासीयांना कमी पडत असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळी वेरूळ टी पॉइंट येथे सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले.

 

आंदोलनादरम्यान कुणीही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही तेव्हा काही संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक केली. यात एका बसच्या काचा फुटल्या असून यात एक प्रवासी जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आंदोलनकर्त्यांना ९ जणांना ताब्यात घेतले. रास्ता रोकोमुळे वेरूळ, औरंगाबाद व खुलताबाद  शहर अशा तिन्ही बाजूंनी वाहतूक तासभर ठप्प झाली होती.   


खुलताबाद शहरात आठ टँकरने सुमारे दोन लाख ८० हजार लिटर पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी शहराला कमी पडत आहे. त्यामुळे शहरातील काही नागरिकांनी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले होते. सकाळी पावणेअकरा वाजता रस्ता रोकोला सुरुवात झाली होती. रास्ता रोकोसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्ते नगराध्यक्ष हाय हाय, नगरसेवक हाय हाय, हमारी मागे पुरी करो, दर दुसऱ्या दिवशी पाणी सोडा नसता खुर्च्या सोडा अशा घोषणा देत होते. रास्ता रोको सुरू होऊन १५ मिनिटे उलटली तरीही कुणीही शासकीय अधिकारी येत नसल्याने अांदोलनकर्ते संतप्त झाले. 

 

सहायक पोलिस निरीक्षक ई.जी.पाटील व अनिल बेंद्रे यांनी आंदोलनकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते समजण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अर्धा तास उलटला तरीही कोणताही अधिकारी आला नाही. काही वेळानंतर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून निवेदन घेण्यासाठी आले. कुणी मोठा  अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने अांदोलनकर्त्यांनी अांदोलन तीव्र केले. तोपर्यंत आंदोलनाला ४० मिनिटे झाली होती. तिकडे वेरूळच्या अर्ध्या घाटापर्यंत तर दुसरीकडे औरंगाबाद रस्त्यावर कोर्टापर्यंत, फुलंब्री रस्त्यावर शहरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असताना काही युवकांनी आरडाओरड सुरू केली व उभ्या एसटी बसवर दगडफेक केली. त्यामध्ये अमळनेर -औरंगाबाद बसच्या पाठीमागील दोन्ही काचा व १ काच उजव्या बाजूची फुटली.

 

दोन दिवसांआड पाणी सोडण्याची मागणी   
निसार पठाण, मसिओद्दीन शुत्तारी, कलिमोद्दीन खुदबोद्दीन यांच्यासह शहरवासीयांनी दोन दिवसांआड पाणी सोडण्याची मागणी केली आहे. सध्या आठ टँकर सुरू असले तरी पंधरा दिवसांआड पाणी सोडण्यात येत आहे. शहराला दररोज बारा लाख लिटर पाण्याची गरज आहे. असे असताना पंधरा दिवसांनंतर पाणी सोडले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...