आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरग्यात 50 लाखांची अमली पदार्थाची पावडर जप्त; गोदामात सुरू होता कारखाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- जकेकुर चौरस्ता येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका गोदामातून बंगळुरू येथील  केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने कारवाई करून ५० लाख रुपयांची अमली पदार्थाची पावडर व कच्चा माल जप्त केला. गोदाम  ४ दिवसांपूर्वीच सील करण्यात आले होते. गुरुवारपासून (दि. ११) सुरू करण्यात आलेली गोदामाची तपासणी शुक्रवारी रात्रीपर्यंत संपलेली नव्हती. 


कांही दिवसापूर्वी हैदराबाद येथे ४६ किलो अमली पदार्थांची पावडर पोलिसांनी जप्त केले होती. डीआरआय पथकाने चौकशी केल्यानंतर याचे धागेदोरे उमरगा येथील जकेकुर-चौरस्ता येथील औद्योगिक वसाहतीतील गोदामात असल्याचे समोर आले. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच पथकाने येथे छापा मारून गोदामाला सील ठोकले होते.  गुरुवारी चारच्या सुमारास पथकातील १५ कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली.  औद्योगिक वसाहतीतील प्रगती इलेक्ट्रिकल वर्क असे लिहिलेल्या या गोदामात  धुंदी आणणाऱ्या गोळ्या तयार करण्यासाठी वापरली जाणारी अर्धा किलो मिथोक्युलोन पावडर सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पन्नास लाख रुपये या पावडरची किंमत आहे. पथकाने पावडर ताब्यात घेतली असून अन्य कच्च्या मालाची रात्री उशिरापर्यंत पथकाकडून मोजदाद सुरू होती. पुणे येथील सुरेश राजनाळे यांच्या मालकीचा हा गोदाम असून संबंधित व्यक्तीला औषधी कंपनीसाठी भाडेतत्वावर देण्यात आल्याची माहिती आहे.  पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिनेश जाधव केंद्रीय महसूल गुप्तचर विभागासोबतच तपासात सहकार्य करीत आहेत. उद्या दुपारपर्यंत चौकशी पूर्ण होऊन अधिकृत माहिती प्राप्त होईल, असे  जाधव यांनी सांगितले.


कमालीची गुप्तता  : पथकाकडून ही कारवाई करत असताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. स्थानिक पोलिसांनाही शुक्रवारी दुपारपर्यंत माहिती नसल्याचे समजते. दरम्यान असा खळबळजनक प्रकार जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांकडून कसा दुर्लक्षित राहिला, हा प्रश्न आहे. पोलिस, महसूल विभाग, अन्न व औषध प्रशासनाला याचा थांगपत्ताही लागू न शकल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

असा होतो पावडरचा उपयोग
 जप्त केलेली पावडर काही औषधांमध्ये वापरण्यात येत असते. मात्र, तिचा इतक्या मोठ्याप्रमाणात औषधी तयारी करण्यासाठी उपयोग होत नाही. मात्र, गुंगी आणण्यासाठी अंमली पदार्थ म्हणून उपयोग होतो. काही ठिकाणी मोठ्या शहरातील हॉटेल, पब येथे पूर्वी कारवाई करून अशी पावडर जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक विख्यात सिनेअभिनेत्री व तिच्या पतीवरही पावडर विक्रीप्रकरणी एका ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...