आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लातूर - आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अनेक जण सिनेतारका, राजकारण्यांना बोलावून ग्राहकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मात्र निलंग्यातील एका व्यापाऱ्याने आपल्या लातूरमधील व्यवसायाची सुरुवात करताना एका गरीब शेतकऱ्याच्या मुला-मुलीचे लग्न लावून त्याचा संपूर्ण खर्च उचलून एक नवा पायंडा घातला आहे.
निलंगा येथील सिद्राम चाैकात गेल्या १८ वर्षांपासून रामलिंगेश्वर फर्टिलायझर्स हे दुकान चालवतात. त्यांनी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर लातूर येथे शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु आपल्या या दुकानाच्या उद्घाटनावर अवाढव्य खर्च न करता त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुला - मुलींचे विवाह स्वखर्चाने करून देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या १०१ वर्ष पूर्ण करीत असलेल्या वडिलांच्या वयाची शतकपूर्ती आणि दुकानाचे उद्घाटन असा दुहेरी मेळ घालून त्यांनी हा विवाह लावून दिला. औसा तालुक्यातील हासेगाव वाडीच्या केवळ एक एकर कोरडवाहू शेती असणाऱ्या चंदर कदम यांची मुलगी गोकर्णा हिचा विवाह त्यांनी निलंगा तालुक्यातील जाजनूर येथील दोन एकर शेती असणाऱ्या माधव शिंदे यांच्या श्रीनाथ नावाच्या मुलासोबत लावून दिला.
या गरीब शेतकरी कुटुंबातील वधू-वरांचा दोन्ही बाजूंचा सर्व खर्च करून विवाह लावून देण्यात आला. या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला लातूर, निलंगा आणि औसा तालुक्यातील अनेकांची उपस्थिती होती.
मित्रांमुळे सूचली कल्पना
चाकोते यांचे शेती साहित्याचे दुकान असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न कळाले. पण ते सोडवण्यासाठी आपण काय वाटा उचलू शकतो हे त्यांना सूचत नव्हते. त्यांच्या दोन ते तीन मित्रांनी त्यांना शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न लावण्याची कल्पना सूचवली.
दोन लाखांवर खर्च
चाकोते यांना या कार्यासाठी दोन लाख रुपयांवर खर्च आला. दोन्ही बाजूंचे कपडे, मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी व इतर साहित्य, दोन्ही बाजूंचे वऱ्हाड लातूर येथे घेऊन येण्यासाठी वाहनांचा खर्च, विवाहस्थळावरची सर्व व्यवस्था, वऱ्हाडींचा जेवणाचा खर्च त्यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.