आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज व नापिकीला कंटाळून परभणी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- कर्ज व नापिकीच्या कारणावरून जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील राम रघुनाथ काकडे तर सेलू तालुक्यातील धामणगाव येथील कृष्ण कारभारी डख या दोन शेतकऱ्यांनी बुधवारी(दि.२०) आत्महत्या केली. 


पिंपळदरी येथील राम काकडे(५०) यांना मागील चार वर्षांत सातत्याने नापिकीला तोंड द्यावे लागत होते. शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी युको बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेत काकडे मागील काही दिवसांपासून होते. आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत असताना काकडे यांनी बुधवारी सकाळी सातच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


दुसऱ्या घटनेत सेलू तालुक्यातील धामणगाव येथील कृष्ण कारभारी डख(३६) यांनी बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. डख यांनीही कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड ते करू शकत नव्हते. शेतीतून गेल्या तीन वर्षात अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. उलट शेती तोट्यात गेल्यामुळे ते कर्जाच्या बोजाखाली अडकले होते. या विवंचनेत असताना त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक फौजदार नितीन काशीकर अधिक तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...