आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेतून भाजपमध्ये येणाऱ्यांची आमच्याकडे 'वेटिंग लिस्ट'; खासदार दानवेंचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जिल्ह्यातील प्रमुख नेता शहरात नसताना शिवसेनेचा विभागीय मेळावा घेतला जातो याचा अर्थ शिवसेनेत मंत्र्यांना किंमत राहिली नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना लक्ष्य केले. शिवसेनेच्या जाचाला कंटाळून अनेक शिवसैनिक भाजपमध्ये येण्यास तयार असून त्यांची वेटिंग लिस्ट तयार असल्याचा दावा खासदार दानवे यांनी केला. रविवारी शहरात आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. 


वैशिष्ट्यपूर्ण योजना ठोक तरतुदीअंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये २ कोटी ७० लाख रुपये, तर प्रभाग ११ मध्ये १ कोटी १० लाखांच्या विकास कामांचे उद््घाटन खासदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, तर माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, सरचिटणीस देविदास देशमुख,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार दानवे यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती देत विरोधकांचा समाचार घेतला. आजपर्यंत शहरात ज्यांची सत्ता होती त्यांनी शहराच्या विकासाकडे कधीच लक्ष दिले नाही. भाजपची सत्ता आल्यावर शहरात ५५ कोटी रुपयांचे सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असून काही कामे मंजूर करावयाची आहेत. शहरात पाणी कमी व वीजबील अधिक यायचे. जुनी नळ योजना नादुरुस्त होती त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून या योजनेच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपये मंजूर केले. जालना-वडीगोद्री रस्त्यासाठी चारशे कोटी रुपये मंजूर केले. आयसीटी कॉलेज मंजूर झाले आहे. शिवाय शहराच्या वैभवात भर घालणारा महत्त्वाकांक्षी सिडको प्रकल्प मंजूर केला आहे. तर ड्रायपोर्टचे काम सुरू असून जालना लोकसभा मतदारसंघात सहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे दानवेंनी सांगितले. 


..तर शिक्षा भोगेल 
जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी काेणती विकासकामे केली यावर समोरासमोर येऊन कलगीतुरा ठेवावा. यात गेल्या चार वर्षातील माझी विकासकामे कमी पडली, तर मी शिक्षा भाेगण्यास तयार आहे. मात्र, विरोधक कमी पडले तर त्यांनीही जनता देईल ती शिक्षा भाेगण्यास तयार राहावे, असे सांगतानाच खासदार दानवे यांनी आपण विकासकामांच्या भरवशावर पुन्हा विजयी होणार असल्याचा दावा केला. 


शहरासारखा विकास करू 
पुढच्या काळात जालना शहर औरंगाबादसारखे होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही असे खासदार दानवे यांनी सांगितले. 


त्यांची पत घसरली 
मुखिया शहराबाहेर असताना शिवसेनेचा विभागीय मेळावा शहरात होतो याचा अर्थ जालन्यातील शिवसेना नेत्यांची शिवसेनेत किती किंमत आहे हे दिसते. त्यांची पक्षात पत घसरल्यामुळेच ते विदेशात फिरताहेत अशा शब्दांत दानवेंनी खोतकरांवर निशाणा साधला. तर अनेक शिवसैनिक व बडे पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. त्यांची वेटिंग लिस्ट आपल्याकडे असल्याचा दावा दानवे यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...