आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Man Supply Water To Thirsty Villagers In Nanded District

भगीरथाने आणली गावासाठी गंगा! तहानलेल्या गावक-यांची भागवली तहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभुळगावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडलेले पाणी. मोरे यांच्या पुढाकारामुळे दुष्काळातही गावाला पाणीटंचाईची झळ पोहोचली नाही. (छाया सारंग नेरलकर, नांदेड)
नांदेड - भयाण दुष्काळामुळे खरिपात झालेले नुकसान आिण पाण्याअभावी रब्बीही हाती पडणार नसल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे, पाण्यासाठी होणारे ग्रामस्थांचे हाल पाहून बाबूळगावातील (ता. नांदेड) दत्तात्रय नामदेवराव मोरे यांनी रब्बी हंगामातील १० लाखांच्या उत्पन्नावर उदक सोडले आणि तहानलेल्या गावाला पाणीपुरवठा सुरू केला.

दत्तात्रय मोरे व त्यांच्या वडिलांच्या नावे १२ एकर जमीन आहे. एक शेत गावापासून दोन किलोमीटरवर आहे, तर दुसरे शेत गावाजवळ आहे. दूरच्या शेतात विहीर व कूपनलिका आहे. गावाजवळील विहीर कोरडी पडल्याने दूरच्या शेतातील पाणी दोन किलोमीटर पाइपलाइन टाकून त्यात आणले. या पाण्यावर गहू, हरभरा, भाजीपाला ही पिके घेण्याची तयारीही त्यांनी सुरू केली, पण गावात पिण्याच्या पाण्याचे होत असलेले हाल पाहून त्यांनी निर्णय बदलला.

ग्रामस्थांच्या व्यथेने द्रवले मन : बाबूळगाव हे २८७० लोकवस्तीचे गाव. येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ८० हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. मात्र, ज्या विहिरीतून पाणीपुरवठा होतो तीच आटत चालल्याने पाणीटंचाई सुरू झाली. गावात जवळपास १२५ नळ कनेक्शन आहेत. सध्या अवघा १०-१५ मिनिटे पाणीपुरवठा होतो. त्यात भारनियमन असेल, तर पाणीच येत नाही. महिलांना दिवसभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावक-यांचे हे हाल पाहून मोरे यांनी पिके घेण्याऐवजी गावाला पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला.

बाभुळगावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडलेले पाणी. मोरे यांच्या पुढाकारामुळे दुष्काळातही गावाला पाणीटंचाईची झळ पोहोचली नाही. (छाया सारंग नेरलकर, नांदेड)

स्वखर्चाने पाणीपुरवठा
काही मित्रांच्या मदतीने मोरेंनी शेतातील विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत स्वखर्चाने पाइपलाइन टाकली. टाकीत पाणी सोडण्यासाठी विहिरीवर मोटारही बसवली. शासकीय मदतीविना गावात पाणीपुरवठा करणारे सर्व पाइप दुरुस्त केले. त्यांच्या प्रयत्नामुळे गावात आता रोज सकाळ-संध्याकाळ तीन तास पाणीपुरवठा होतो. सर्व वस्त्यांना एकाच वेळी पाणी मिळते.

उत्पन्न पुढच्या वर्षी होईल
रब्बी हंगामात आम्हाला दहा लाख रुपयांचे उत्पन्न होते, परंतु गावक-यांचे हाल पाहून वाईट वाटले. महिला रात्री-बेरात्री उठून पाणी भरतात हे पाहून दु:ख झाले. शेतीचे उत्पन्न या वर्षी नाही झाले, तर पुढच्या वर्षी होईल. म्हणूनच सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय घेतला.
दत्तात्रय नामदेवराव मोरे, शेतकरी, बाबूळगाव, ता. नांदेड