आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडा‘राज’: सासरच्या घरावर डोळा; पोलिस पत्नीच्या डोक्याला लावला कट्टा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- सासूचे घर नावावर करून देण्याची धमकी देत पतीने पोलिस कर्मचारी असलेल्या पत्नीच्या डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यातील आंधळेवाडी येथे रविवारी रात्री घडली.  केज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पिस्तूल जप्त करून पोलिस पत्नीला धमकावणाऱ्या पतीला जेरबंद केले.  

परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अनुराधा राजेश रोडे या पोलिस कॉन्स्टेबल म्हणून काम करीत  आहेत.  त्या पती राजेश रोडेबरोबर रविवारी केज तालुक्यातील आंधळेवाडी येथे आजीकडे आल्या होत्या. रात्री साडेदहा वाजता टोकवाडीला चल, असा राजेश रोडे याने तगादा लावला असता आता  उशीर  झाला असे कारण पुढे करून अनुराधा यांनी टोकवाडीला जाण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांत वाद झाला. आपण आग्रह करूनही पत्नी येत नसल्याने राजेश रोडे याने अनुराधाला मारहाण करायला सुरुवात केली.  या वादाची अनुराधा यांनी आपले मामा संजय ढोबळे यांना मोबाइलवरून  माहिती दिली. यानंतर राजेशने आपल्या कमरेचे पिस्तूल काढून अनुराधा  यांच्या डोक्याला लावले आणि सासूच्या नावे असलेले घर आपल्या नावे करण्यासाठी धमकावले.  
 
दरम्यान, केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी राजेश रोडे याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील गावठी पिस्तूल जप्त  केले.  अनुराधा यांच्या तक्रारीवरून केज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. आईचे घर नावावर करण्यासाठी राजेश नेहमीच मारहाण करत असल्याचे अनुराधा यांनी तक्रारीत म्हटले आहे.    

यापूर्वीही गावठी कट्टा बाळगल्याचा गुन्हा: राजेश रोडे हा परळी तालुक्यातील टोकवाडी येथील रहिवासी आहे. या पूर्वीही परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात राजेश याच्यावर हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रॉपर्टीसाठी त्याने अनुराधाशी लग्न केले असावे, असे केजचे पोलिस निरीक्षक  एस.बी. हुंबे यांनी सांगितले.

न्यायालय पद्धतीने केले होते लग्न
पोलिस असलेल्या अनुराधा रोडे यांचे २० डिसेंबर २०१५ रोजी राजेश रोडे ( रा. टोकवाडी, ता. परळी )  बरोबर कोर्ट मॅरेज  झालेले असून सध्या त्या प्रसूती रजेवर अाहेत. त्यांना चार महिन्यांची एक मुलगी आहे. त्यांच्या  आई विमल काकडे या पंचशीलनगर, बीड व वडील ज्ञानोबा काकडे हे हरिश्चंद्र पिंपरी येथे  राहतात.    

पिस्तूल पाहून महिलांची आरडाओरड 
अनुराधा रोडे व राजेश रोडे यांच्यात वाद सुरू झाल्याने शेजारचे लोक जमा झाले होते.  शेजाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजेशने कमरेचे पिस्तूल काढून अनुराधाच्या डोक्याला लावताच महिलांनी आरडाओरड केली. तेवढ्यातच केज ठाण्यातील पोलिसही हजर झाले.
बातम्या आणखी आहेत...