आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, बसमध्येच नेले रुग्णालयात, डॉक्टरांनी केले मृत घोषित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- चालत्या बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चालक, वाहकाने प्रसंगावधान राखत जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बस घेऊन जात प्रवाशावर प्रथमोपचार केले. प्रकृती गंभीर होत असल्याने तेथील डॉक्टरांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला सोडवण्यास गेल्याने व दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने बसनेच या प्रवाशाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चालक वाहकांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले जिल्हा रुग्णालयात दाखल करताच त्या प्रवाशाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुणे - बीड बसमध्ये मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.    


बीड आगाराची पुणे- बीड बस पुण्याहून बीडला येत असताना जामखेड येथे थांबली. जामखेड येथून या बसमध्ये सय्यद जलील सय्यद आशामिया (७४, रा. बीड मामला, मोमीनपुरा, बीड) हे बीडला येण्यासाठी बसले. पाटोदा तालुक्यातील नायगावजवळ बस आल्यानंतर  हृदयविकाराचा झटका आला.त्यांच्या छातीत दुखून त्यांना चक्कर आली.

 

रुग्णवाहिका नसल्याने अडचण   
नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला सोडण्यास गेलेली असल्याने तिथे दुसरी पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे चालक कदम व वाहक चव्हाण यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने जलील यांना बसने जिल्हा रुग्णालयात आणली. बसच जिल्हा रुग्णालयात आल्याने रुग्णालयातही गर्दी झाली. 

 

धावपळ निष्फळ   
चालक कदम, वाहक चव्हाण यांनी धावपळ करून जलील यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी नायगावपासून प्रयत्न केले मात्र जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करताच मृत घोषित करण्यात आल्याने इतर प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली.    

बातम्या आणखी आहेत...