बीड- मासेमारीच्या वादातून शुक्रवारी ठेकेदाराच्या गुंडांनी भोई समाजातील व्यक्तींवर केलेल्या हल्ल्यात राधाबाई गणेश लिंबोरे (28) ही गर्भवती महिला गंभीर जखमी झाली होती. बाळाच्या हृदयाचे ठोक बंद पडल्याने राधाबाईंचा गर्भपात करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. माजलगाव धरणावर मासेमारी करण्यावरून भोई समाज व मासेमारीचा ठेका मिळालेल्या माणिकशहा संस्था यांच्यात वाद आहे.
शुक्रवारी हा वाद पुन्हा उफाळला. माणिकशहा संस्थेच्या पदाधिकार्यांनी व गुंडांनी भोई समाजाच्या वस्तीवर हल्ला केला. त्यात राधाबाई यांच्यासह 9 महिला व चार पुरुष असे 13 जण गंभीर जखमी झाले होते. राधाबाईंना आधी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सोनोग्राफी अहवालानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झाल्याने डॉक्टरांनी राधाबाईच्या गर्भपाताचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राधाबाईंच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.