आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षांपासून फरार आरोपी परतूर पोलिसांच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर- आठ वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीस परतूर पाेलिसांनी अटक केली. उत्तम काळदाते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव अाहे. गाेपनीय सूत्रांनी माहिती दिल्यानंतर परतूर पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील दिग्रस येथून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या प्रकरणात परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही मात्र तरी परतूर पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून ही कामगीरी बजावली.  

१३ सप्टेंबर २००९ मध्ये अंबड तालुक्यातील गोंदी शिवारात शेख हबीब शेख लाल याचा गळा चिरून खून करण्यात आला होता.या बाबत गोंदी पोलिसात उत्तम विठ्ठल काळदाते, राधाबाई, सचिन उत्तम काळदाते यांच्यासह इतर दोन आरोपी विरुद्ध अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून पोलिस सदरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. मात्र काही दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील दिग्रस येथे उत्तम काळदाते याच्या कुटुंबातील व्यक्ती आठवडी बाजारात फिरताना दिसले. त्यानुसार मृताच्या नातेवाइकांनी यासंदर्भात परतूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. 

जाधव यांनी गोंदी पोलिसांशी संपर्क साधून असा गुन्हा नोंद असल्याची आणि त्यातील आरोपी फरार असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर सेलू आणि परिसरातील गावामध्ये शोध घेतला असता सदरील फरार आरोपी पावडे हदगाव येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, भीमराव राठोड, मिलिंद सुरडकर यांच्या पथकाने पावडे हदगाव शिवारात दुपारच्या वेळेस शेळ्या चारत असलेल्या आरोपी उत्तम विठ्ठल काळदाते याच्या मुसक्या आवळल्या. 
बातम्या आणखी आहेत...