आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरला महापूजेसाठी जाणाऱ्या बुलडाण्याच्या भाविकांचा मृत्यू; दुसऱ्या घटनेत महिलेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वानगाव येथे झालेल्या अपघातात जीपचा अक्षरश: चुराडा झाला. - Divya Marathi
वानगाव येथे झालेल्या अपघातात जीपचा अक्षरश: चुराडा झाला.
बीड- पंढरपूरला महापूजेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला चौसाळ्यानजीक वानगावजवळ झालेल्या अपघातात चार जण ठार, तर सात जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. सर्व मृत जखमी हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. साखरझोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

बुलडाणा येथील दिवंगत माजी आमदार डॉ. राजेंद्र गोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील विविध भजनी मंडळे महापूजेसाठी पंढरपूरला जात होते. एकूण ३० गाड्यांचा ताफा भाविकांना घेऊन पंढरपूरकडे जात असताना सोमवारी पहाटे बीड तालुक्यातील वानगावजवळ त्यांच्या ताफ्यातील १८ व्या क्रमांकाच्या गाडीला (एमएच २८ सी २३५३) समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एपी २९ व्ही २००१) जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, यात जीपचा अक्षरश: चुराडा झाला. यात जीपमधील प्रदीप मीनाजी खर्चे (२६), अक्षदा संजय चौधरी (१७), जया विलास चोपडे (४५), दिनेश निवृत्ती खर्चे (५५, सर्व रा. शेलगाव बाजा, ता. मातोळ, जि. बुलडाणा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश भास्कर खर्चे, रवींद्र वसंत खर्चे, वैशाली रवींद्र खर्चे, रूपाली प्रदीप खर्चे, मंदाकिनी खर्चे, धनराज बाबूराव पाटील, रंजना खर्चे हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
अनेकांची रुग्णालयाकडे धाव 
अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. ताफ्यातील इतर भाविकांनीही रुग्णालयात गर्दी केली होती, तर अपघाताची माहिती कळल्यानंतर शेलगाव बाजार येथूनही नागरिक बीडमध्ये आले होते.
 
शेलगाव सुन्न 
शेलगाव या एकाच गावातील जणांचा अपघाती मृत्यू आणि सात जण गंभीर जखमी झाल्याने शेलगाववर शोककळा पसरल्याचे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या काही ग्रामस्थांनी सांगितले. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनीही पुढाचा दौरा रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली. 

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन 
पंढरपूरला जाणारे भाविक पहाटे झोपेत असताना अपघात झाला. अनेकांना तर अपघात झाल्याचेही कळले नाही. झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शेलगाव येथे मृतदेह नेण्यात आले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा बस झाडावर आदळून महिला ठार, सहा जखमी... 
बातम्या आणखी आहेत...