आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ वर्षीय मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या टोळीला जमावाकडून चोप, कार पेटवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भरधाव वेगातील अपहरणकर्त्यांची कार उलटली.
बाबासाहेब डोंगरे/ समाधान तेलंग्रे, जालना/पारध - 'तेरे पिताजी ने घर पर बुलाया है, जल्दी चल' असे म्हणत १४ वर्षीय मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात घडली. दरम्यान, पळून जाणा-या या टोळीने भरधाव गाडी चालवून भोकरदन तालुक्यातील मादणी-बोरखेडा गावादरम्यान दोन दुचाकीस्वारांना चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
तरीही गाडी पुढे पळवताना ती उलटली.

रामचंद्र ऊर्फ चंद्रकांत विष्णू एडके (बिसूर, ता. मिरज, जि. सांगली) असे मृताचे नाव असून सुदर्शन जाधव हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील हे दोघेही मक्याचे व्यापारी असून मका खरेदीसाठी ते भोकरदन तालुक्यात आले होते. दुचाकीने (एमएच २० बीएफ १८८७) जाताना मागून आलेल्या कारने (एमएच २८ व्ही २६६६) त्यांच्या दुचाकीस धडक दिली. माहिती मिळताच पारध पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच अजिंठा पोलिसांना कळवले. निसारखाँ मानउल्लाखाँ मुलतानी (पीरबावडा, ता. फुलंब्री ह. मु. अन्सारी कॉलनी, पडेगाव), दिलीप निंबाळकर व मनोज रामचंद्र निंबाळकर (गाजियापुरा, ता. बाळापूर ह. मु. भावसिंगपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. जमावाने चोप दिल्याने हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांनाही घाटीत दाखल केले.

आधीच सूचना दिल्या
अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय असल्याबाबत परिसरात अफवा होती. विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पी.आर. राऊत, मुख्याध्यापक

असा घडला हा प्रकार
*शेख आमिर शेख खलील (१४, शिवना) हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठवीत शिकतो. आमिर दुपारी शाळेत जायला निघाला होता. याच वेळी शाळेजवळ एक पांढ-या रंगाची गाडी उभी होती. त्यातील एक जणाने आमिरला म्हटले, तेरे पिताजी ने घर पर बुलाया है, जल्दी चल. मात्र, आमिरचे वडील हयात नसल्यामुळे त्याला संशय आला. त्याने तत्काळ शाळेत जाऊन शिक्षक सलीम अहेमद कुरेशी यांना हा प्रकार सांगितला.

*शिक्षक येत असल्याचे पाहून निसारखाँ मानउल्लाखाँ मुलतानी व अन्य दोघे गाडीत बसून पळू लागले. दरम्यान, शिक्षकांनी ही माहिती आन्वा, जळगाव सपकाळ, आडगाव भोंबे, मादणी, धावडा गावातील ओळखीच्या लोकांना सांगितली व गाडीचा क्रमांक दिला. त्यानुसार गावक-यांनी जागोजागी रस्त्यावर दगड लावले. ही गाडी धावड्याजवळ आली. जमाव पाहिल्याने गाडी पुन्हा मागे वळली.गावक-यांनी पाठलाग सुरू केला.

*याच वेळी भरधाव गाडीने समोरील दुचाकीस धडक दिली. यात रामचंद्र एडकेचा जागीच मृत्यू झाला, तर सुदर्शन जाधव जखमी झाला. त्यानंतरही गाडी थांबेना. अपघातानंतर अजिंठ्याकडे जाताना एका ट्रकला ओव्हरटेक करताना त्यांची गाडीच उलटली. त्यानंतर पाठलाग करणा-या व आजूबाजूच्या जमावाने त्या तिघांना गाठून चोप दिला. अजिंठा पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेऊन उपचारासाठी घाटीत पाठवले.
पुढे पाहा, घटनेशी संबंधित छायाचित्रे..