आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशवारी करणाऱ्या फार्मासिस्टना दणका, उस्मानाबादमधील 11 परवाने निलंबित, दोन रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- औषध कंपन्यांतर्फे परदेशगमन करण्यासाठी जाताना मेडिकल दुकाने वाऱ्यावर टाकण्याऱ्यांसह १३ दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफएडी) दणकेबाज कारवाई केली.  यामध्ये दोन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अन्य दुकानांचे परवाने १५ ते ७५ दिवसांपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. कार्यालयीन सुट्या असलेल्या दिवशी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुकानांवर छापे मारले. 

आपल्या मालाची अधिक विक्री करणाऱ्या विविध औषध कंपन्यांकडून मेडिकल दुकानदारांना पॅकेज दिले जातात.  अशी परदेशवारी करण्यासाठी जिल्ह्यातील काही दुकानदार गेले होते. मात्र, यातील काहींनी आपल्या दुकानात दुसऱ्या फार्मासिस्टची व्यवस्था न करता औषध वितरणाचे अधिकृत ज्ञान नसलेल्या व्यक्तीच्या जीवावर दुकान सोडले होते. अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी करून या औषधी दुकानांना दणका दिला. तसेच अन्य दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे.  

प्रशासनाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तथा औषधी निरीक्षक सुनील गवळी यांनी मेडिकल दुकानांना भेटी देऊन दोषी दुकानांवर कारवाई केली. यामध्ये उस्मानाबाद येथील ख्वॉजानगर येथील इंडियन मेडिसिन हाऊस व जळकोट (ता. तुळजापूर) सागर मेडिकल ७५ दिवस, दाळींब (ता. उमरगा) येथील श्रद्धा मेडिकल, कसबे तडवळे येथील नेहल मेडिकल ३१ दिवस, उमरगा येथील रविराज मेडिकल, माकणी (ता. लोहारा) येथील साई समर्थ मेडिकल, उस्मानाबादच्या बसस्थानक जवळील धन्वंतरी मेडिकल, उमरगा येथील गुरुकृपा मेडिकल या दुकानांचा ६१ दिवस, परंडा येथील गोल्डन चौकातील न्यू संजीवनी व आकाश मेडिकलचा १५ दिवस, उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाजवळील गांधी मेडिकेअर पॉइंटचा परवाना सात दिवसांसाठी  निलंबित करण्यात आला आहे.  

दोन परवाने कायमचे रद्द 
मानवी शरीरासाठी घातक असलेले स्टेरॉईडयुक्त औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री करणाऱ्या काटी (ता. तुळजापूर) येथील न्यु हिंदुस्तान व वाशीच्या सिद्धीविनायक मेडिकलचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. अनेक दुकानदारांनी पावतीशिवाय औषधे देणे, प्रिस्क्रिप्शन नसताना औषधे देणे, असाही प्रकार केल्याचे आढळले आहे.

सुटीच्या दिवशी भेटी 
कार्यालयीन सुटी असताना कर्मचारी काम करत नाहीत, हे माहिती असल्यामुळे काही दुकानदारांनी सुटीच्या दिवशी फार्मासिस्ट हजर न ठेवताच दुकान सुरू ठेवले. मात्र, निरीक्षक गवळी यांनी सुटीच्या दिवशीही भेटी देऊन तपासण्या केल्या. यामुळे त्यांना अनेक त्रुटी दिसून आल्या.  

संधी देऊन कारवाई
नागरिकांच्या आरोग्याचा संबंध असल्यामुळे मेडिकल्सची सातत्याने पाहणी व पर्यवेक्षण करण्यात येत आहे. दोष आढळला तर म्हणने मांडण्याची संधी देऊन कारवाई करण्यात आली. आणखी  दुकानांच्या तपासण्या सुरू आहेत. 
- सुनील गवळी, प्र. सहाय्यक आयुक्त
बातम्या आणखी आहेत...