आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपविभागीय अधिका-यांच्या खुर्चीसह वाहनाची जप्ती, मावेजा न दिल्याने कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार जालना उपविभागीय अधिका-यांच्या खुर्चीसह, शासकीय वाहन आणि इतर साहित्यांची जप्ती करण्यात आली. ३ लाख ४७ हजार ३९७ रुपयांच्या थकीत रकमेसाठी सोमवारी दुपारी ही कारवाई केली. कारवाईनंतर जप्त साहित्य न्यायालयात जमा करण्यात आले. वाढीव मोबदल्यासाठी आणखी तीन शेतक-यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या प्रकरणातही जप्तीचा आदेश असल्याने या कार्यालयातील आणखी काही साहित्य जप्त होण्याची शक्यता आहे.

बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक येथे पाझर तलावासाठी २००५ मध्ये काही शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या; परंतु संपादित जमिनीसाठी अत्यल्प मोबदला दिल्याने चार शेतक-यांनी वाढीव मावेजा देण्यात यावा या मागणीसाठी ३१ मे २००६ मध्ये दिवाणी न्यायालयात धाव घेतली. त्यात शेतक-यांच्या तक्रारीवर सुनावणी होऊन ४ एप्रिल २०१२ रोजी न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतरही वाढीव मोबदला न दिल्याने शेतक-यांनी रक्कम मिळण्याचा दावा अर्थात डिक्री ऑफ एक्सीक्युशन दाखल केला; परंतु त्यानंतरही जालना उपविभागीय कार्यालयाने यासंदर्भात काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी न्यायालयाचे आदेश घेऊन जप्तीची कारवाई करण्यासाठी पथक उपविभागीय कार्यालयात गेले; परंतु या कार्यालयाने वाढीव मावेजाची रक्कम देण्यात येईल जप्तीची कारवाई करू नये अशी विनंती केल्याने तेव्हा जप्ती टळली होती. शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील अॅड.आर.जे. बनकर यांच्यासह अॅड.राजेश वाघ, बेलिफ आर.आर. वैष्णव, एन. ए. काळे, पी. एस. सरवदे आदींची उपस्थिती होती.

एकाच अर्जावर कार्यवाही
अकोला निकळक येथील पाझर तलावाच्या वाढीव मोबदल्यासाठी चार शेतकरी न्यायालयात गेले होते. चौघांनाही वाढीव मोबदला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी बद्री रंगनाथ वाघ यांच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. त्यांना ३ लाख ४७ हजार ३९८ रुपये वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला आहे.

आणखी तीन आदेश
अकोला निकळक येथील याच पाझर तलावासाठी आणखी अण्णा साळुबा गवारे, फकीरबा बालाजी मोरे आणि सदाशिव मोरे यांना न्यायालयाने १२ लाख रुपये वाढीव मावेजा मंजूर केला आहे. त्यांनीही न्यायालयात धाव घेतल्याने जप्ती आदेश दिले आहेत. त्यामुळे या कार्यालयात आणखी जप्ती होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आठवडाभरापूर्वीच एसडीएम रुजू
उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर शासनाने आठवडाभरापूर्वीच श्रीकुमार चिंचकर यांची नियुक्ती केली आहे. रुजू झाल्यानंतर इतर न्यायालयीन कामकाजानिमित्त काही दिवस ते मुंबईतच होते, अशी माहिती सूत्रांनी िदली.