आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी सावकार हस्तकांच्या घरावर छापा, नऊ जमिनींचे खरेदीखत, पासबुक, धनादेश जप्‍त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - तालुक्यातील वरठाण येथील खासगी सावकार हस्तकांच्या घरावर सहकार विभागाच्या पथकाने शुक्रवारी (२१ ऑगस्ट) छापा टाकला. या छाप्यात नऊ जमिनींचे खरेदीखत, सहा बँक पासबुक, धनादेश, सातबारे आणि तीन वह्या जप्त केल्या आहेत. या छाप्यामुळे सोयगाव तालुक्यातील खासगी सावकारांचे धाबे दणाणल्याचे पाहावयास मिळत आहेत.

सोयगाव तालुक्यात असलेल्या वरठाण येथील शेतकरी बाबू त्र्यंबक खंडाळे, विजय त्र्यंबक खंडाळे, विजय नामदेव सोळंके आणि सुनील आनंदा पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील खासगी सावकार चिंतामण नारायण राऊत व वरठाण येथील सुभाष बळीराम ठाकरे या दोघांविरुद्ध सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यातील मुख्य खासगी सावकार चिंतामण राऊत हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी जवळचे नातेवाईक असलेल्या सुभाष बळीराम ठाकरे यांच्या नावावर खरेदी करून घेत असे. या तक्रारीची दखल घेत सिल्लोड येथील सहकार विभागाचे सहायक निबंधक विष्णू रोडगे, सहकार अधिकारी दिलीप जयस्वाल यांच्या पथकाने शुक्रवारी सुभाष ठाकरे यांच्या वरठाण येथील घरावर छापा टाकला. घराची झाडाझडती घेतली असता शेतजमिनीचे खरेदीखते, तीन १०० रुपयांची स्टॅम्पपेपर, सहा विविध बँकांचे पासबुक, सातबारे आणि हिशेबाच्या तीन वह्या या वेळी जप्त करण्यात आल्या. यानंतर सुभाष ठाकरे यांचे जबाब घेतले. त्यांनंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सहकार विभागाचे सहायक निबंधक विष्णू रोडगे यांनी दिली.
पथकात यांचा समावेश
विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे व जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांच्या मार्गदर्शनात सहायक निबंधक विष्णू रोडगे, सहकार अधिकारी दिलीप जयस्वाल, शकील पठण, सूर्यकांत भायकर, बी. डी. कुंभारे, दिलीप रावणे, पोलिस कॉन्स्टेबल एस. आर. भिवसने, महिला पोलिस कॉन्स्टेबल के. आर. मिस्त्री यांचा समावेश आहे.