आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा दिवसांत पाणी देण्याचा शब्द पाळला, लातूरमध्ये आली ५० टँकरची रेल्वेगाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गेले नऊ दिवस दहा टँकरची गाडी लातूरला आल्यानंतर बुधवारी सकाळी ५० टँकर असलेली रेल्वेगाडी लातूरमध्ये दाखल झाली. याद्वारे लातूरमध्ये एकाच वेळी २५ लाख लिटर पाणी आले आहे. पाण्याची इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लातूरमध्ये येऊन पंधरा दिवसांत लातूरला रेल्वेने पाणी मिळेल, या केलेल्या घोषणेची वेळेत अंमलबजावणी झाल्याचेही यानिमित्ताने अनुभवायला मिळाले.

लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण कोरडे पडल्यामुळे लातूर शहराचा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. साडेपाच लाख लोकसंख्येच्या लातूर शहरावर तीव्र पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. त्यात काही अंशी दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रेल्वेने पाणीपुरवठा करता येतो का? याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे विचारणा केली होती. पंतप्रधानांनीही यात लक्ष घातल्यामुळे रेल्वेने याला हिरवा कंदील दाखवला. मिरजमधून पाणी उचलता येणे शक्य असल्याचे सांगण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर टाकली होती. खडसे यांनी मिरजेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर लातूरमध्ये येऊन पंधरा दिवसांत पाणी देण्याची घोषणा केली होती. वास्तविक आठच दिवसांमध्ये रेल्वेच्या १० टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. गेल्या आठ दिवसांत ५० टँकरमध्ये पाणी भरणे आणि पाणी उतरवून घेण्याच्या सुविधा अनुक्रमे मिरज आणि लातूरमध्ये करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी रात्री अकरा वाजता मिरजमधून पन्नास टँकरची गाडी पाठवण्यात आली. बुधवारी सकाळी आठ वाजता ही गाडी लातूर स्थानकावर पोहोचली. राज्याच्या इतिहासात २५ लाख लिटर पाण्याची एकाच वेळी वाहतूक करण्याची ही पहिलीच घटना आहे.

पाण्याची गाडी चालवल्याचा आनंद आणि दु:खही : मुख्य मोटरमन सुनील खोत आणि सहायक मोटारमन बी. जे. कोळेकर यांनी कुर्डूवाडीहून ही गाडी चालवत आणली. कधी आपल्याला पाण्याच्या गाड्या चालवाव्या लागतील असे वाटले नव्हते. पहिल्यांदाच पाण्याची गाडी चालवली याचा एकीकडे आनंद असला तरी आपल्यावर ही वेळ यावी याचे दु:खही आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, टप्प्याटप्प्याने पाणी उतरवून घेतले... पाणी जलशुद्धीकरण केंद्रात.. रेल्वेने आलेल्या पाण्याची मनपाला किंमतच नाही