आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडत बाजारातील उलाढाल ९० टक्के घटली, बँका, एटीएमच्या बाहेर रांगा कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर : काळ्या पैशाला आवर घालण्यासाठी ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला गुरुवारी महिना झाला. मात्र, नव्याने काढलेल्या २००० रुपयांच्या नोटांची अत्यल्प संख्या आणि ५०० रुपयांच्या नोटाच उपलब्ध न झाल्यामुळे आडत बाजारात ९० टक्के उलाढाल कमी झाली आहे. एटीएम आणि बँकांच्या बाहेर पैशांसाठी लोकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

लातूर शहर हे बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र नोटाबंदीनंतर आडत बाजारातील उलाढाला ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. लोकांजवळ चलनच नसल्यामुळे व्यवहार कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आडत व्यापारी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे पैसे धनादेशाने द्यायला तयार असले तरी शेतकऱ्यांची खाती जिल्हा बँकात आहेत. तेथे चलन उपलब्धता नसल्यामुळे पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे.
ग्रामीण भागात रोकड कमतरतेमुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. कृषि आधारीत बाजारपेठेत उधारीवर व्यवसाय सुरू होते. मात्र ठोक खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे महिनाभरानंतर किरकोळ विक्री करणाऱ्यांनाही आता समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एक तारखेनंतर सरकारी कर्मचारी आणि खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या पगारी झाल्या. मात्र त्यांनाही पैसे मिळत नसल्यामुळे दूध, किराणा अशी महिन्याच्या अखेरीस अदा करावयाची बिले थकली आहेत.

एटीएम, बँकांबाहेर रांगा
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बँकाबाहेरच्या रांगा कमी झाल्या होत्या. मात्र एक तारखेनंतर पुन्हा एकदा बँका आणि एटीएमच्या बाहेर रांगा दिसू लागल्या आहेत. एटीएममधून केवळ २००० रुपयेच मिळत आहेत. तर बँकांमध्ये केवळ ५ हजार रुपये मिळत आहेत.
बातम्या आणखी आहेत...