आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: वर्गमित्रांनी जिल्हा परिषदेच्या चार शाळा घेतल्या दत्तक, पाच वर्षांपासून चळवळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- व्हॉट्सअॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या  माध्यमातून केवळ चॅटिंग आणि टाइमपास न करता बीड येथील पंधरा वर्ग मित्रांनी एकत्र येत ग्रुप तयार केला. जिल्हा परिषद शाळेतील शेतकरी, सफाई कामगार, ऊसतोड कामगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून मोफत शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी बीडमध्ये चार जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेतल्या आहेत. प्रत्येक वर्षी ६०० मुलांना शैक्षणिक साहित्य मिळत असून पाच वर्षांपासून ही शैक्षणिक चळवळ बीडमध्ये रुजत आहे.  

शहरातील सावरकर महाविद्यालयात एकेकाळी एकत्र शिकलेले १५  वर्ग मित्र  पाच वर्षांपूर्वी दिवाळी  सुट्टीच्या  गेट टुगेदरमध्ये एकत्र आले. एकोप्यातून ते एकमेकांचे नोकरी, कौटुंबिक  प्रश्न सोडवू लागले. २०१२ मध्ये या  वर्गमित्रांनी   ७ ते १४ वर्षे वयोगटातील गरीब व होतकरू मुलांसाठी  एज्युकेशन फॉर ब्राइट फ्युचर संस्थेची स्थापना केली.  

बीडमधील  गांधीनगर, अशोकनगर, शिदोड, धनगरवाडी या चार जिल्हा परिषदेच्या  शाळा त्यांनी मोफत शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी दत्तक घेतल्या. दर वर्षी जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात  शनिवारी  अशा शाळेतील  विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. शालेय साहित्य वाटपाची माहिती  विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून शाळेत  एक नोटीस फिरवली जाते. त्यानंतर शाळा मुख्याध्यापकांशी चर्चा करून इयत्तेनुसार शैक्षणिक साहित्याचे संच तयार केले जातात.  विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, दप्तर,वह्या, पेन,  मराठी भाषा, गणित, भूगोलचे  चार्ट देण्यात येतात. चित्रमय पद्धतीने वर्ग रंगवून दिला जातो. प्रत्येक वर्षी चार शाळेतील ६०० विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्य मोफत भेट देण्यात येते. मागील पाच वर्षांपासून ही चळवळ नेटाने सुरू आहे.  

बीडचा कट्टा
बीडमधील निषाद माने, सचिन डहाळे, राहुल कागदे, सुनील कुटे, भागवत कव्हाळे, अमरीश पवार, संतोष नवले, आदित्य खोपटीकर, विशाल लोढा, अभय चिंचोलीकर, सचिन देशपांडे, प्रदीप डोईफोडे, संकेत बाहेती, डॉ. अमित काळे,  हे पंधरा वर्गमित्र एकत्र आले.३ वर्षांपूर्वी या वर्गमित्रांनी बीडचा कट्टा हा ग्रुप सुरू केला आहे. 

फेसबुक पेज पाहून दुबईच्या महिलेची मदत   
बीडमधील  या शिक्षणप्रेमी  वर्गमित्रांनी एज्युकेशन फॉर अ ब्राइट फ्युचर या नावाने  फेसबुक पेज सुरू केले आहे. हे पेज पाहून मागील वर्षीच दुबई येथील अभियंता कविता दळवी यांनी या ग्रुपच्या उपक्रमासाठी आठ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. मुंबई येथील एका व्यापाऱ्यानेही पाच हजार रुपयांची मदत केली होती.  
बातम्या आणखी आहेत...