आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 20 Years Marathwada Agriculture University Rename

वीस वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामविस्ताराला यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - मागील 20 वर्षांपासून कृषी विद्यापीठास वसंतराव नाईकांचे नाव देण्यासाठी विविध मार्गांनी संघर्ष करणा-या बंजारा समाजातील विविध संघटनांना आनंद झाला. नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षातच हा निर्णय झाल्याने त्यांनी याचे स्वागत केले, तर संभाजी सेनेने राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.


मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संघर्षातून मराठवाडा कृषी विद्यापीठाची 18 मे 1972 रोजी परभणीत निर्मिती झाली. तत्पूर्वी परभणी येथे कृषी महाविद्यालय कार्यान्वित होते. येथील कृषी विद्यापीठाची निर्मिती ही सहजासहजी झालेली नव्हती. त्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी व जनतेने मोठी आंदोलने केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याच काळात चार विद्यापीठांची निर्मिती करताना परभणीला मराठवाडा कृषी विद्यापीठ मिळाले. 1990 च्या सुमारास बंजारा क्रांती दलाने वसंतराव नाईकांचे कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात यावे, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. बंजारा क्रांती दलासह भारतीय बंजारा परिषद, वसंतराव नाईक संघर्ष सेना अशा बंजारा समाजातील विविध संघटनांसह बंजारा समाजाने ही मागणी रेटून धरली. या प्रश्नावर परभणीत बंजारा क्रांती दलाने रास्ता रोको, धरणे आंदोलन केले होते.


सत्तेचा गैरवापर करून नामविस्तार
नामविस्ताराचा हा निर्णय दुर्दैवी आहे. मराठवाड्यातील जनतेची अस्मिता दुखावली गेली असून सत्तेचा गैरवापर करीत हा निर्णय घेतला गेला आहे. 26 जूनला औरंगाबादेत मोर्चा काढणार आहे.
रामेश्वर शिंदे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी सेना


भटक्या विमुक्त समाजाला न्याय
परभणीच्या कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव द्यावे अशी मागणी सात-आठ वर्षांपासून मी विधानसभेत लावून धरली. अखेर वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाने ही मागणी मान्य केली. - प्रदीप नाईक , आमदार किनवट (राष्‍ट्रवादी काँग्रेस)


जन्मशताब्दी वर्षात श्रद्धांजली
वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षात विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन राज्य शासनाने ख-या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे.
- सतीश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष, बंजारा युवक क्रांती दल


नाईकांच्या कृषिप्रेमाचा गौरव
ज्या व्यक्तीचे शेतीवर, शेतक-यावर अत्यंत प्रेम होते, अशा वसंतराव नाईकांनी प्रत्येक विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या काळात केला. कृषी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या कार्याचा हा गौरव होय.
गोपीनाथ राठोड, अध्यक्ष, भारतीय बंजारा परिषद