आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Tenth Days Not A Single BJP Leaders Take Election Rally In Latur, Divya Marathi

दहा दिवसानंतरही लातूरमध्ये भाजपच्या एकाही नेत्याची सभा नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार अडीच लाख मतांनी विजयी झाल्यानंतर विधानसभेला भाजप ताकदीनिशी मैदानात उतरेल अशी चर्चा होती. मात्र, निवडणुकीसाठीचा अर्ज भरून दहा दिवस उलटल्यानंतरही लातूरमध्ये भाजपच्या एकाही छोट्या-मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही.

लातूर जिल्ह्यातील सहापैकी दोन मतदारसंघांत भाजपला विजयाची खात्री आहे. मात्र, अर्ज भरून दहा दिवस झाल्यानंतरही निलंगा वगळता जिल्ह्याच्या इतर पाच मतदारसंघांकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवली आहे. निलंग्यात पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेल्या आणि सध्या गडकरींच्या तंबूत असलेले संभाजी पाटील निलंगेकर निवडणूक लढवत आहेत. मुंडे असताना नितीन गडकरींची लातूर जिल्ह्यात अपवादानेच सभा झाली. मात्र, मुंडेंच्या पश्चात संभाजी निलंगेकरांसाठी नितीन गडकरी रविवारी निलंग्यात आले होते. यापूर्वी गडकरी समर्थक मानले जाणा-या विनोद तावडे यांनीही निलंगा तालुक्यातील देवणीत सभा घेतली. मात्र, इतर ठिकाणी एकही सभा झाली नाही. लातूर ग्रामीण या मतदारसंघात सध्या भाजपचा जोर आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या मांजरा पट्ट्यात भाजपने चांगलाच जोर लावला असून काँग्रेसची दमछाक होत आहे. येथे प्रदेश स्तरावरील एकाही नेत्याने सभा घेतली नाही.
मुंडे गटातील असलेल्या रमेश कराड या ग्रामीणच्या उमेदवारासाठी कुणीही ताकद लावलेली नाही. दुसरीकडे लातूर शहर मतदारसंघात भाजपने मामुली फॅक्टरची पुनरावृत्ती करण्यासाठी शैलेश लाहोटी यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, विधानसभा लढण्याचा अनुभव नसणे आणि नियोजनाच्या अभावामुळे त्यांची दमछाक होते आहे. स्थानिक भाजपची मंडळीही त्यांच्या सोबत दिसत नाही. मारवाडी, मुस्लिम, लिंगायत आणि रेड्डी समाजाची मते मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ही मते गमावल्यामुळेच विलासरावांचा १९९५ मध्ये पराभव झाला होता. पुन्हा एकदा तोच फॅक्टर आजमावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.