आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणातील एन्काउंटरनंतर राज्यात सतर्कतेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - खांडवा तुरुंगातून फरार झालेल्या दोन अतिरेक्यांचे तेलंगणात एन्काउंटर झाल्यानंतर राज्यात अति सतर्कतेचा आदेश देण्यात आला. उर्वरित अतिरेकी तेलंगणाशेजारच्या जिल्ह्यात घुसण्याची शक्यता आहे. नांदेडच्या एटीएस पथकाने त्या दृष्टीने सोमवारपासून शोधमोहीम हाती घेतली असून शहरात मोक्याच्या जागी उर्वरित चार अतिरेक्यांचे फोटो लावणे सुरू केले.

खांडवा जेलमधून फरार झालेल्या अतिरेक्यांचा म्होरक्या अबू फैजल हा होता. त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर या गँगचा म्होरक्या एजाज झाला. तेलंगणात झालेल्या एन्काउंटरमध्ये त्याचाही खातमा झाल्याने ही गँग सैरभैर झाली असण्याची शक्यता आहे. एन्काउंटरमध्ये दोन अतिरेक्यांसोबत पोलिस कर्मचार्‍यांचेही बळी गेले आहेत. त्यामुळे तेलंगणा पोलिसांनी उर्वरित अतिरेक्यांच्या शोधासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर हुसेन ऊर्फ सादिक खान (३२) या अतिरेक्याची सासुरवाडी नांदेड आहे. त्याला आधार कार्ड देण्याबाबत शिफारसपत्र दिल्यावरून नुकतीच एका माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली. झाकीरही नांदेडला मुक्कामी राहून गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यासोबत इतरही त्याचे साथीदार नांदेडच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे.

खांडवा तुरुंगातून पळालेल्या सहा अतिरेक्यांचे यापूर्वीही दीड वर्षापूर्वी शहरात पोस्टर लागले, परंतु तेलंगणातील एन्काउंटरनंतर सोमवारी एटीएसच्या पथकाने शहरातील मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी उर्वरित चार अतिरेक्यांचे फोटो लावणे सुरू केले. एटीएमच्या बाहेर दोन्ही बाजूला विशेषकरून पोस्टर लावले जात आहेत.