छायाचित्र: अवंती कारसह विनयकुमार मुंदडा
जालना - देशातील पहिली स्पाेर्ट्स कार "अवंती'चे इंजिनिअरिंग डिझाइन करण्याचा मान जालन्याचे विनयकुमार मुंदडा यांना जातो. वयाच्या सत्तरीत दोन वर्षे अथक मेहनतीतून मुंदडा यांनी डिझाइन साकारलेल्या या कारने सर्व तांत्रिक कसोट्या पूर्ण केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ती बाजारातही दाखल झाली आहे.
जालन्याच्या राष्ट्रीय हिंदी विद्यालयात व नंतर औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी काॅलेजात शिक्षण घेतलेल्या मुंदडा यांनी बजाजच्या टेम्पो ट्रॅक्ससह, मेटॅडोर, मिनीडोर, जीप अशा वाहनांचे डिझाइन केले आहे. भारतात एसयूव्ही कार तयार होत नाही. त्या आयात कराव्या लागतात. त्यासाठी दोन ते १२ कोटी मोजावे लागतात. हे पाहून मुंदडा यांनी या क्षेत्राकडे लक्ष वळवले. दोन वर्षांत कारचे स्टायलिंग व डिझाइन पूर्ण झाले. कंपनीतील १५ ते २० जणांची टीम व पाच मित्रांच्या सोबतीने मुंदडा यांनी ही जबाबदारी पूर्ण केली. डिझाइन अनेक वेळा ते बदलावे लागले. अॉटोमोबाइल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाची मान्यता व देशभरात दीड लाख किलोमीटर धावण्याची कसोटी पूर्ण केल्यानंतर दिलीप छाबरिया डिझाईन, पुणे ही कंपनी सध्या या कारच्या निर्मितीत व्यग्र आहे. एप्रिल महिन्यातच काही ग्राहकांना या कारचा ताबा देण्यात आला आहे. वाहन विक्रीतील संस्थांच्या वेबसाइटवर सध्या या कारचे छायाचित्र झळकत आहे.
जालन्यात बनला फ्युएल टँक
अवंती कारच्या इंधन टाकीचा साचा अर्थात फ्युएल टँक मोल्ड जालनाच्याच विनोदराय इंजिनिअर्सने तयार केला आहे. जालन्यातील उद्योग क्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब आहे.
भारतीय रस्त्यांचा विचार
आयात एसयूव्हीचे ग्राउंड क्लिअरन्स अर्थात जमिनीपासूनची उंची कमी असते. त्यामुळे भारतीय रस्त्यांवर त्या स्पीड ब्रेकरला टच होण्याची शक्यता असते. "अवंती'च्या डिझाइनमध्ये मुंदडा यांनी यावर लक्ष दिले. या गाडीला १७० मिमी (स्विफ्ट डिझायरइतके) ग्राउंड क्लिअरन्स ठेवले.
किराणा दुकान ते कार डिझाइन
मुंदडांचा जन्म ५ जुलै १९४८ रोजी जालन्यात झाला. बडी सडक येथील घरातच त्यांचे किराणा दुकान होते. ४५ वर्षे या क्षेत्रात नोकरी केल्यावर ते निवृत्त झाले. ६९ व्या वर्षीही सध्या पुण्यात फ्रीलान्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. पत्नी रजनी शिक्षिका, तर मुलगा रवींद्र अॉटोमोटिव्ह डेव्हलपमेंट क्षेत्रात आहे. कन्या वर्षाने सायबर लॉ केले आहे.
दोन वर्षे जीव ओतून अवंतीचे डिझाइन केले. त्यामुळे अवंती माझा मेंदू, माझं हृदय आहे. तिच्याशी भावनिक नाते आहेच. मी केलेली टेम्पो ट्रॅक्स आणि इतर विविध वाहने रस्त्यावर दिसतात. अनेकांसाठी ती राेजगार निर्माण करतात हे पाहून आनंद वाटतो. - विनयकुमार मुंदडा, इंजिनिअर
पुढे वाचा, इतर स्पाेर्ट्स कारहून सरस