आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड : नांदेडमध्ये प्रचंड मोर्चा तर परभणीत कडकडीत बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे (खालसा) हत्याकांडाच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाने सोमवारी शहर दणाणून सोडले. बसपा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, काँग्रेस तसेच विविध दलित संघटना या मोर्चात सहभागी झाल्या.

या हत्याकांडाच्या निषेधार्थ गंगाचाळ, सिडको आदी भागातूनही मोर्चे काढण्यात आले. गौतम बुद्धांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेपासून निघालेल्या प्रमुख मोर्चात इतर भागातून निघालेले मोर्चे सहभागी झाल्याने या मोर्चाला महामोर्चाचे स्वरूप आले. आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडिले, बापूराव गजभारे, सुरेशदादा गायकवाड, रमेश सोनाळे आदींसह १५ हजारांहून अधिक महिला व पुरुष या मोर्चात सहभागी झाले. जवखेडे येथे तीन जणांचा खून करणा-या आरोपींना तत्काळ शोधून काढा व त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मोर्चेक-यांनी केली. आयटीआय चौक, शिवाजीनगर, कलामंदिर, छत्रपती शिवाजी चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देण्यात आले.
परभरणीत बंद
परभणी शहरातील विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सोमवारच्या परभणी बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. बंददरम्यान संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. मोर्चादरम्यान काही दुकानांवर दगडफेकीचे प्रकारही घडले. मागील दहा दिवसांपासून विविध संघटनांच्या वतीने जवखेडे हत्याकांडाचा निषेध निवेदने, धरणे आंदोलन, निदर्शने या मार्गांनी सुरू असून त्यानंतर विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येऊन राज्य सरकारला या प्रकरणी जाब विचारण्यासाठी सोमवारच्या परभणी बंदचे आवाहन केले होते. त्यास व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फोटो - अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे (खालसा) येथील तिहेरी खून प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी नांदेड शहरात दलित संघटना, काँग्रेस, पीपल्स रिपाइं, बसपा आदी पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले. छाया : सचिन डोंगळीकर, नांदेड