आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्म सुरक्षा समितीच्या मोर्चाने नांदेड दणाणले, 'एमआयएम'वर बंदी घाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- हिंदू धर्म सुरक्षा समिती व रामजन्मोत्सव समितीच्या वतीने गुरुवारी एमआयएमच्या विरोधात काढलेल्या मोर्चाने शहर दणाणून सोडले. मोर्चात जवळपास १५ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले.

विधानसभा निवडणुकीच्या काळात गाडीपुरा भागात दोन जणांचा खून झाला. खुनातील आरोपी हे एमआयएमचे कार्यकर्ते असल्याचा दावा करण्यात आला. या घटनेनंतरही एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अनेक सभांमधून हिंदू देवी- देवतांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. त्यामुळे एमआयएम पक्षावर बंदी घालावी या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी मोर्चा गाडीपुरा भागातूनच निघणार होता. परंतु तणावाची स्थिती लक्षात घेता मोर्चाला गाडीपुरा येथून पोलिसांनी परवानगी नाकारली. नंतर मल्टिपर्पज हायस्कूलच्या मैदानावरून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली. गुरुवारी दुपारी १२ वाजता मल्टिपर्पज हायस्कूल समोरील पंचवटी हनुमान मंदिरात महाआरती करून मोर्चाला प्रारंभ झाला. वजिराबाद चौक, शिवाजी चौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
मोर्चात संतमंडळी, नेते मात्र गायब
या मोर्चात जगदीश महाराजासह अनेक संतमंडळी सहभागी झाली, परंतु राजकीय पक्षांचे नेते मात्र गायब होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, लातूरचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील, दीपकसिंह रावत, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार भाजपचे अरुंधती पुरंदरे, चैतन्यबापू देशमुख, व्यंकटेश साठे यांचा अपवाद वगळता दोन्ही पक्षाचे मोठे नेते मोर्चापासून अलिप्त राहिले.
सराफा, कापड दुकाने बंद
मोर्चाला दि क्लॉथ मर्चंट वेलफेअर असोसिएशन, सराफा असोसिएशनने पाठिंबा दिला. मोर्चाच्या निमित्ताने शहरातील सराफा दुकाने बंद ठेवण्यात आली. वजिराबाद, जुना मोंढा भागातील कापड दुकानेही बंद ठेवण्यात आली. इतर दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
एमआयएम विरोधात नारेबाजी
मोर्चात एमआयएम व अध्यक्ष ओवेसी यांच्याविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. ‘हिंदू हित की बात करेगा, वही देश मैं राज करेगा’ असे रामजन्मभूमी आंदोलनातील नारेही मोर्चात लावण्यात आले. एमआयएम या पक्षावर बंदी घाला, अशी मागणी मोर्चातील कार्यकर्ते करीत होते.