आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation For Janshatabdi Express Stopped In Jalna

जालन्यात जनशताब्दीची वाट पाहू आंदोलन स्थगित, 15 दिवसांत निर्णय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जालन्यातून जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने साेमवारपासून वाट पाहू आंदोलन सुरू केले जाणार हाेते. मात्र, आंदोलन सुरू होण्यास दोन तासांचा अवधी शिल्लक असतानाच नांदेड विभागाचे व्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

रेल्वे प्रशासनाने जनशताब्दी एक्स्प्रेस नक्की कधी सुरू होणार याची घोषणा करावी, अशी मागणी करीत जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने वाट पाहू आंदोलनाचा इशारा दिला होता. जालन्यातून जनशताब्दी सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेत समितीचे सदस्य प्रवासाच्या साहित्यासह जालना स्थानकावर ठाण मांडून बसणार होते. रेल्वेप्रश्नी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाला. यात ९५ हजार नागरिकांनी सह्या केल्या.
दोन दिवसांपूर्वी स्वाक्षरी मोहिमेचा समारोप झाला. त्यामुळे वाट पाहू आंदोलनातही जालनेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. परंतु आंदोलन सुरू होण्यासाठी काही तासांचा अवधी असताना विभागीय व्यवस्थापक पी.सी.शर्मा यांनी पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व अांदोलन मागे घेण्याची विनंती केली. या वेळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी, उपाध्यक्ष अॅड. विनायक चिटणीस, फिरोजअली मौलाना आदी उपस्थित होते.

१५ दिवसांत निर्णय
खासदार रावसाहेब दानवे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करणार आहेत. त्यात जालना स्थानकावर सुरू असलेल्या कामांबाबत आढावा घेतला जाईल. त्यानंतर या गाडीचा मुहूर्त ठरणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील सूत्रांनी दिली. सध्या जनशताब्दीसाठी आवश्यक असलेली कामे येथे सुरू आहेत. ही कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने निर्णयास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पुढील १५ दिवसांत यावर निर्णय होईल.

रेल्वेमंत्र्यांनाही साकडे
जालना-खामगाव रेल्वे मार्ग सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समितीने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत ९५ हजार नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. त्यात एक लाख सह्या घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर याचे निवेदन रेल्वेमंत्र्यांना दिले जाणार आहे. यामध्येही जनशताब्दी एक्स्प्रेसचीही मागणी केली जाणार आहे.