आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टंचाईच्या झळा : पाण्यासाठी संताप, ग्रामस्थांचा रास्ता रोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोरकीन / बिडकीन - पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे, दरेगाव, जोडवाडी या गावांना काही दिवसांपूर्वी प्रशासनाने खंडित केलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बुधवारी बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. बुधवारी दुपारी बारा वाजेपासून हे रास्ता रोको आंदोलन तासभर चालल्यामुळे औरंगाबादहून आणि पैठणकडून येणाऱ्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या एक ते दीड किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, मनसे तालुका सचिव विजय चव्हाण, डोणगाव तांबे गावचे सरपंच सुनील तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रास्ता रोकोदरम्यान पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होत कशी नाही, झालीच पाहिजे, अशा नारेबाजीने परिसर दणाणून गेला. याप्रसंगी अन्नदाता शेतकरी संघटनेचे सूर्यवंशी म्हणाले, १९९८ मध्ये मजीप्राच्या माध्यमातून दीड कोटी खर्च करून वरवंडी येथील पाझर तलावातून पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केली होती. त्यानंतर या तलावातून पाच ते सहा वर्षे या गावांना पाणीपुरवठा सुरू होता. परंतु २०१४ मध्ये या गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश देऊन राज्याच्या तत्कालीन पाणीपुरवठा मंत्र्यांनी ही योजना परवडत नसल्याचे कारण पुढे करत कायमस्वरूपी बंद केली. त्यामुळे जवळपास आठ ते नऊ हजार नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली. तलावात पुरेसे पाणी असूनही गेली तीन वर्षे टँकरने पाणीपुरवठा होत आहे. या योजनेच्या कामावर चार कर्मचारी कार्यरत असून त्यांच्यावर दरमहा एक लाख रुपये वेतन स्वरूपात खर्च होतो. त्याचबरोबर विज बिलही भरावे लागते. त्यामुळे या योजनेचा खर्च ग्रामपंचायतीला परवडणारा नाही. त्यामुळे ही योजना जनहितासाठी मजीप्राने चालवावी, अशी मागणी केली. मनसेचे तालुका सचिव विजय चव्हाण, डोणगाव तांबे येथील सरपंच सुनील तांबे यांनीही या वेळी भाषणातून शासन-प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी संजय राऊत यांनी पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आसलेल्या ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी चेअरमन कल्याण तांबे, माणिक राठोड, पांडुरंग तांबे, नितीन ठाणगे, मनोज मुरदारे, सागर फरताळे, विजय शेळके, सनी शिंदे, महिला वर्षा तांबे, जयश्री तांबे, दीपिका पवार, ममता वाघ, कलावती घोरपडे, यमुना तांबे, सारिका पवार, कांताबाई ढोले, मथुराबाई भोजने, कडुबाई जाधव, केसरबाई तांबे, सरसाबाई ढोले आदी महिलांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिडकीनचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाढे, सहायक पोलिस निरीक्षक जोगदंड, दुल्लतसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

पालकमंत्र्यांच्या घराचे नळ कनेक्शन बंद करणार
राज्य शासनाकडून शहरी भागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिका, नगरपालिका असलेल्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मग ग्रामीण भागासाठीच हा दुजाभाव का? असा सवाल प्रशासनाला केला. ही योजना पूर्ववत सुरू न झाल्यास आम्ही पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या घराच्या नळाचे कनेक्शन बंद करू आणि त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.
बातम्या आणखी आहेत...