आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनासाठी सचखंड रोको, पाणी पेटले, जायकवाडीचे पाणी कालव्यात दिलेच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - जायकवाडीचे पाणी डाव्या कालव्यावरील बी ७० मध्ये न सोडल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मिरखेल रेल्वेस्थानकावर सचखंड रेल्वे रोखली.

परभणी - जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना विशेषत: बी ७० कालव्यावरील मिरखेल परिसरातील सिंचनाच्या पाण्यासाठी वंचित केल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शुक्रवारी (दि.१४) मिरखेल रेल्वेस्थानकावर सचखंड रेल्वे रोखली.

भाकपचे जिल्हा सरचिटणीस राजन क्षीरसागर, उद्धव देशमुख, संदीप सोळंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जायकवाडीतून सोडण्यात आलेले पाणी दुष्काळग्रस्त शेतक-यांना प्राधान्यक्रमाने देण्याची कायदेशीर तरतूद असताना हेतूत: पाणी बंद करण्याचा हा प्रकार संतापजनक असल्याचे म्हटले आहे. जायकवाडीतून दोन पाणी पाळ्या देण्याचे जाहीर करूनही २५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या रोटेशनचे पाणी मिरखेल परिसरातील व बी ७० कालव्यावरील शेतक-यांना दिले नाही. उलट रोटेशन पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य कालवाही बंद करण्यात येत आहे. १२२ किलोमीटर कालव्यावर ११०० ते १२०० क्युसेक दाबाने पाणी देऊन परभणी जिल्ह्यासाठी ७४ दलघमी पाणी द्यायचे नियोजन असताना प्रत्यक्षात केवळ ३२ दलघमी (४३ टक्के) पाणी देऊन मुख्य कालवा बंद करण्यात येत आहे. दिलेले पाणीदेखील कमी दाबाने देऊन शेतक-यांना अडचणीत आणले आहे, असेही भाकपचे जिल्हा सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी म्हटले आहे. शेतक-यांना देशोधडीला लावण्याच्या या प्रकारामुळे शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने पाणी सोडण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत शेतक-यांनी सकाळी मिरखेल रेल्वेस्थानकावर सचखंड रेल्वे १० मिनिटे अडवली.

आंदोलकांच्या मागण्या
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला भाकपने यासंदर्भात मागण्यांचे निवेदन दिले असून त्यात मिरखेल, बलसा, पिंपरी देशमुख आदी गावच्या शेतक-यांना पाणी द्यावे, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.