आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation From 2oth April For Janshatabdi Railway

जनशताब्दीसाठी रेल्वे संघर्ष समितीचे २० एप्रिलपासून 'वाट पाहा' आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - रेल्वेसंदर्भातील विविध समस्या सोडवण्यासाठी जालना संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. याचा पहिला टप्पा म्हणून जालना-खामगाव रेल्वेमार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढच्या टप्प्यात जनशताब्दी जालन्यातून सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी २० एप्रिलपासून जालना रेल्वेस्थानकावर वाट पाहा आंदोलन केले जाणार आहे.

जालना येथ्ून जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू केली जाणार असल्याची केवळ माहितीच दिली जात आहे. प्रत्यक्ष ही रेल्वे कधी धावणार, हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळेच जनशताब्दीसाठी २० एप्रिलपासून रेल्वेस्थानकावर वाट पाहा आंदोलन केले जाणार आहे. रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन हाती घेण्यात येणार आहे.

त्यासाठी सकाळी ८ ते १० या वेळेत संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रवासाचे सर्व साहित्य घेऊन रेल्वेस्थानकावर जनशताब्दीची वाट पाहणार आहेत. ही रेल्वे सुरू होण्याची तारीख जाहीर होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

यात संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी जालन्याच्या नागरिकांनाही सहभागी करून घेण्याचे निश्चित केले आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिका-यांनी ही माहिती दिली. या वेळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी, रेल्वे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अॅड. विनायक चिटणीस, रेल्वे संघर्ष समितीचे फिरोजअली मौलाना, रमेश देहेडकर, संतोष गाजरे, छोटेखान पठाण, प्रभुलाल गोमतीवाले आदींची उपस्थिती होती. रेल्वेच्या विविध प्रश्नांवर सध्या स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे जनशताब्दीसाठी हाती घेण्यात आलेल्या आंदोलनालाही प्रतिसाद मिळेल आणि रेल्वे प्रशासनाकडून या नव्या रेल्वेची घोषणा केली जाईल, असा विश्वास संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला.

स्थानकावर कामेही सुरू
जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्यातून सुरू होण्यासंदर्भात केव्हाही निर्णय होऊ शकतो. त्यासाठी रेल्वेकडून येथे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा, प्लॅटफॉर्म क्रमांक तीनमध्ये विशेष तांत्रिक बदल, रेल्वे वॉशिंगची सुविधा आदींचा समावेश आहे.

जालनेकरांचे हाल
जालना व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे येथून मंुबईला जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या मुंबईत कामानिमित्त जायचे असल्यास जालनेकरांना औरंगाबादहून जनशताब्दी गाठावी लागते, अन्यथा एक दिवस अगोदर मुंबईत जावे लागते. जालन्यातून ही रेल्वे सुरू झाल्यास सोय होईल.

एक लाख सह्यांचे उद्दिष्ट
जालना-खामगाव रेल्वेमार्ग सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी रेल्वे संघर्ष समितीने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत ९० हजार नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. यात एक लाख सह्या घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रविवारी तीर्थक्षेत्र राजूर येथे मोहीम राबवण्यात येणार आहे.