आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमाला फाशीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला बैलगाडी मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - काय पाहिजे.. काय पाहिजे..   गरिबाला न्याय पाहिजे! अशा घोषणा देत अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील महिला ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. गिरवली येथील शेतमजूर महिलेवर तीन आठवड्यांपूर्वी अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक करून फाशीची शिक्षा द्यावी  या मागणीसाठी नराधम प्रतिबंधक मोर्चा काढण्यात आला. गिरवली ते अंबाजोगाई असे १२ किलोमीटर अंतर कापत महिला, पुरुष, वृद्ध ६० बैलगाड्यांसह मोर्चात सहभागी झाले.    
 
गिरवली येथील शेतमजूर महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तीन आठवड्यांनंतरही पकडले जात नाही. त्याला  फरार होण्यासाठी पोलिसांनीच मदत केली असल्याचा आरोप करत गिरवली  येथील ग्रामस्थ, महिला सोमवारी गावात एकत्र आले. ग्रामस्थांनी घरांना कुलूप लावून  नराधम प्रतिबंधक मोर्चाला गावातून सकाळी दहा वाजता सुरुवात केली. गिरवली ते अंबाजोगाई असे १२ किलोमीटर अंतर कापत  दुपारी १२ वाजता हा मोर्चा अंबाजाेगाई  शहरात आला.  

दुपारी एक वाजता येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. या मोर्चात  महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, तरुणींसह ६० बैलगाड्या, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती. अंबाजोगाई शहरात मोर्चेकऱ्यांची तीन किलोमीटर रांग लागली होती.
 
उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना पाच शालेय विद्यार्थिनींनी निवेदन दिले. या मोर्चामध्ये शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट, मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया, दाजीसाहेब लोमटे, सुनील लोमटे, अॅड. संतोष पवार, अॅड. माधव जाधव, शामराव आपेट, तानाजी देशमुख आदी मोर्चामध्ये सहभागी झाले.

काय आहे नेमके प्रकरण
गिरवली येथील वाल्मीक आपेट यांच्या शेतात सालगडी दांपत्य आहे. महिलेचा पती शेतात कामाला गेला. त्या नंतर महिलाही गावातीलच मालकाच्या परसामध्ये गुरांना पाणी पाजण्यासाठी गेली होती. हे पाहून बाळू श्याम काळे या रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. बर्दापूर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तीन आठवड्यांपासून आरोपी फरार आहे.

जिणे मुश्कील
गावगुंडांनी महिलांचे जिणे मुश्कील केले असून आरोपी हा कुठल्याही जातीचा असला तरी त्याला फाशीची शिक्षाच दिली पाहिजे.   
- प्रियंका लंगे, विद्यार्थिनी
बातम्या आणखी आहेत...