आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation In Osmanabad Of Javkhende Dalit Killing Issue

नराधमांना फाशीची शिक्षा द्या, उस्मानाबादेत मोर्चेकर्‍यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- नगर जिल्ह्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली असून, शासनाने अद्याप आरोपींना पकडलेले नाही. त्यामुळे पोलिसांची निष्क्रियता अधोरेखित होत आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना जाहीर फाशी द्यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन कृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. सोमवारी शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे ही मागणी करण्यात आली.

शहरातील भीमनगर भागातून दुपारी मोर्चा काढण्यात आला. समितीचे धनंजय शिंगाडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मिलिंद रोकडे, माजी आमदार दयानंद गायकवाड, कैलास शिंदे, प्रा. संजय कांबळे आदी नेत्यांची मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती होती. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दशकापासून दलित अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात व नगर जिल्ह्यात घडल्या असून, तेथील समाजमन निष्ठूर झाले आहे. या घटनांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षाचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे. देशात पुरोगामी तत्त्वाचा टेंभा मिरवणाऱ्या पक्ष, संघटना केवळ निषेध करून सांत्वनाचे चार शब्द बोलून आर्थिक मदत घोषित करून निघून जात आहेत. मात्र, ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरला आहे, त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे राज्यात दलित समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आरोपींना शिक्षा होत नाही तोवर ही जखम भळभळत राहणार आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करून मागणी करतो की, निर्घृण हत्या करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपींना लवकर पकडून जाहीरपणे फाशी देण्यात यावी. या वेळी डी. जी. हौसलमल, रवी माळाळे, प्रसेनजित सरवदे, यशवंत माळाळे, प्रज्ञावंत ओव्हाळ, मेसा जानराव, सागर चव्हाण, पृथ्वीराज मस्के, सिद्धार्थ सिरसाठ, सिद्धार्थ सोनवणे, हुंकार बनसोडे आदी उपस्थित होते.