आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agricultural Technology Management Agency's Project

आत्मा योजना: जालन्यात 2100 शेतकऱ्यांच्या गटशेतीतून समृद्धीत आडकाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शेतकऱ्यांसाठी विविध उद्योगाभिमुख अभ्यास दौरे ठेवणे, गटशेतीसह जोडधंदा, पिकांचे व्यवस्थापन आदी उपक्रमांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आत्माच्या माध्यमातून केले जाते. २०१३-१४ या वर्षात आत्मा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५८७ शेतकऱ्यांनी गटशेती तर १४ शेतकरी गटांनी कंपन्या सुरू केल्या आहेत. मात्र, २०१५ मध्ये ५० लाखांची गरज असताना केवळ १५ लाखांचा निधी प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे.
सलग चार वर्षांपासून दुष्काळ, अत्यल्प पाऊस, नापिकी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी शेती करण्यासाठी निरुत्साही दिसून येत आहेत. हा निरुत्साह काढून टाकण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातीलच आत्मा ही एक योजना काम करीत आहे. यातून रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, गटशेती, सेंद्रिय शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, दर्जेदार पिकांचे उत्पादन, फळभाज्यांच्या पिकांची विक्री व्यवस्थापन आदी उपक्रमांसाठी शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे घडविण्यात येतात. यातून शेतकरी सकारात्मक होऊन उद्योगाभिमुख होतात. आत्माच्या नियोजनामुळे २०१३-१४ या वर्षात जिल्हाभरात १ हजार ५८७ शेतकऱ्यांनी गट स्थापन केले आहेत. यामुळे जिल्ह्यात तब्बल ४ हजार शेतकरी एकमेकांच्या व्यवसायासंबंधी जोडले गेले आहेत. याबरोबरच १४ शेतकरी गटांनी गावपातळीवर कंपन्या सुरू केल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊन शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थापनाचेही धडे दिले गेले आहेत. यामुळे ही योजना दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे मनौधैर्य वाढविण्यासाठी लाभदायी ठरत आहे. दोन वर्षांत जिल्ह्यातील २ हजार १०० शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यातून स्वावलंबी केले आहे, परंतु २०१५ या वर्षात १२ लाख २७ हजार केंद्रांचा तर ३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
तालुकानिहाय शेतकरी कंपन्या
जालना तालुक्यातील रेवगाव, हस्तपिंपळगाव, भोकरदन, वालसावंगी, बरंजळा, परतूर तालुक्यातील श्रीष्टी, बाभळी, आष्टी, मंठा तालुक्यातील हेलस, जयपूर, बदनापूर सेलगाव, मात्रेवाडी, हिवरा राळा, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, माहोरा या १४ गावांमध्ये कंपन्या स्थापन केल्या आहेत.
१४ शेतकरी गट कंपन्या
०४ हजार शेतकरी झाले सहभागी
१६ जणांची टीम जालन्यात.
शेती कंपनीतूनही उत्पन्न
जो शेतकरी गट गावात कंपनी स्थापन करणार आहे. याची नोंदणी आत्माच्या केंद्रात केली जाते. यातून शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १ हजार रुपये नोंदणी म्हणून घेतले जाते. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात बदल होतो, परंतु अत्यल्प निधी मिळाल्याने शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचे प्रशिक्षण देताना अडचणी येतात.
डी. एम. दिवटे, प्रकल्प संचालक, आत्मा
- शेतकरी शेतीपासून दुरावला जाऊ नये यासाठी नावीन्यपूर्ण अभ्यास दौरे घडविणे, कृषी प्रदर्शनाच्या आधुनिक शेती करण्यासाठी उपक्रमांना भेट देणे यातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली आहे. १४ शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्याचे टार्गेट दोन वर्षांत पूर्ण केले आहे. अनुदानाअभावी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याला अडचणी निर्माण होत आहेत.
- अविनाश भोसले, कृषी पणन तज्ज्ञ, एमसीपी, जालना.